ताज्या घडामोडीमुंबई

अडीच हजार डॉक्टर सामूहिक रजेवर ; वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या वर्तणुकीचा निषेध

सचिवांनी संघटनेच्या सदस्यांना अपमानित करून असंसदीय भाषेचा वापर केला, असा आरोप आहे.’

मुंबई | मागील महिनाभरापासून साखळी उपोषण करत असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे शिष्टमंडळ वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांची भेट घेण्यास गुरुवारी गेले होते. या प्राध्यापकांशी चर्चा न करता सचिवांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी प्राध्यापक सामूहिक रजेवर गेले होते.राज्यातील १९ वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक गेली अनेक वर्षे रुग्णालयात कार्यरत असून करोना काळातही अखंड सेवा देत आहेत. या प्राध्यापकांची सेवा नियमित करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी करोनाच्या पहिल्या लाटेत दिले होते. परंतु दोन वर्षे झाले तरी यावर कार्यवाही न झाल्यामुळे ५ जानेवारीपासून या प्राध्यापकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

आपल्या मागण्या मांडण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संघटनेचे शिष्टमंडळ वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय यांना गुरुवारी भेटायला गेले होते. परंतु सचिवांनी संघटनेच्या सदस्यांना अपमानित करून असंसदीय भाषेचा वापर केला, असा आरोप आहे. त्यांनी करोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या डॉक्टरांना बडतर्फ करण्याची धमकी दिली, अशीही संघटनेची तक्रार आहे. शासनाने विहित केलेल्या पद्धतीचा अवलंब करून चर्चा करण्यास गेलेल्या संघटनेच्या सदस्यांना सचिवांनी दिलेल्या वागणूकीचा संघटनेने निषेध केला आहे.

या घटनेचा निषेध करत राज्यभरातील सुमारे अडीच हजार प्राध्यापक शुक्रवारी सामूहिक रजेवर गेले होते. आपत्कालीन सेवा वगळता सर्व सेवांवर डॉक्टरांनी बहिष्कार टाकला होता.

संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे दाद

याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विशेष अधिकाऱ्यांची संघटनेने शुक्रवारी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्यासमोर हा विषय मांडण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख करोनाबाधित असल्यामुळे त्यांची भेट घेणे सध्या शक्य नाही. आता याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका संघटनेने जाहीर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button