Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

नागपुरात रात्रीपासून मुसळधार पाऊस; घरांमध्ये पाणी शिरले, ‘या’ गावांना पुराचा धोका

नागपूरः नागपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असून भंडारा, नागपूर, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडांसह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळं धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

नागपुरात काल रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पूरसदृश्य परिस्थिती लक्षात घेता नागपुरातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने उत्तर नागपुरातील पिवळी नदीच्या काठावरील वस्तीत पाणी शिरले आहे. त्यामुळं नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

संततधार पावसामुळं वेगावखैरी, नांद, वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवतो. तसेच गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचेही त्यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये व गरजेनुसार सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, पाणी वाहत असताना चुकूनही पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये ,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात कोणतीही माहिती द्यायची असल्यास व मदतीसाठी ०७१२-२५६२६६८ टोल फ्री क्रमांक १०७७ चा वापर करावा, असं जिल्हाधिकाऱ्यांनी नमुद केलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button