संशयित कारचा केला पाठलाग, कारमध्ये आढळले ५ बॉक्स, फोडल्यानंतर बाहेर आली लाखोंची विदेशी दारू
![त्या संशयित कारचा केला पाठलाग, कारमध्ये आढळले ५ बॉक्स, फोडल्यानंतर बाहेर आली लाखोंची...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/त्या-संशयित-कारचा-केला-पाठलाग-कारमध्ये-आढळले-५-बॉक्स-फोडल्यानंतर.jpg)
उस्मानाबाद । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
गोवा राज्यात तयार केलेली बनावट विदेशी दारू अवैधरित्या चारचाकी मधून वाहतूक करीत असताना राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने पाठलाग करुन पकडून दोन आरोपीसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप, उपायुक्त पी.एच.पवार यांच्या आदेशानुसार उस्मानाबादचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी संध्याकाळी जकेकूर औद्योगिक वसाहत नजीक लातूर रस्त्यावर करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक एम.एच.२५,/ए.एस.७७८२ मधून दुय्यम दर्जाची विदेशी दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच, तुळजापूर विभागीय निरीक्षक सचिन . जी.भवड, ,जे.बी.चव्हान निरीक्षक तळमोड ,तुळजापूर दुय्यम निरीक्षक चरणसिंह कुंटे,उमरगा दुय्यम निरीक्षक सुखदेव शिद्द ,जवान राजेंद्रसिंह ठाकूर ,विनोद हजारे,झुंबर काळे ,भागवत पाटील ,आर.बी.चांदणे, आदीच्या पथकाने या कारचा पाठलाग करून कार पकडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडलेल्या या कारमध्ये पाच बॉक्स गोवा निर्मित विदेशी दारू आढळून आली. चालक प्रेमनाथ शेषराव वाघमारे (रा. माकणी) यास पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांने तुळजापूर तालुक्यातील शिंदगाव येथील दीपक शिवानंद परशेट्टी यांच्याकडून विकत आणल्याचे सांगितले. या पथकाने त्वरीत शिंदगावातील दीपक पारशेट्टी याच्या घरी छापा मारुन आणखी सहा बाँक्स जप्त करून पारशेट्टी यालाही ताब्यात घेतले.
७ लाख ३२ हजार ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
कारसह ७ लाख, ३२ हजार ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करून दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज रविवारी दोन्ही आरोपीमना उमरगा न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस.बी .शिद व जवान राजेंद्रसिंह ठाकूर करीत आहेत .