अस्वस्थ वाटल्याने प्रवाशांना उतरवले मात्र दवाखान्यात जात असताना कॅब चालकाला मृत्यूने गाठले
![Feeling unwell, the passengers were dropped off, but the cab driver died on the way to the hospital](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/death-2-780x461.jpg)
नागपूर : कार चालवत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने प्रवाशांना उतरवून दवाखान्यात जात असतानाच एका कॅब चालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. प्रदीप रामभाऊ खुटाफळे (५४) असे मृत कॅब चालकाचे नाव आहे. तो भांडेवाडी-पारडी भागात राहतो. सोमवारी नेहमीप्रमाणे प्रदीप सकाळी ८ वाजता नागपूर विमानतळावरून प्रवासी घेऊन पोलीस लाईन टाकळीकडे जात होता. रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांनी लगेच फोनवर आपल्या मित्राला फोन करून मदतीसाठी बोलावले. हे बोलणे ऐकल्यावर कारमधील प्रवाशांनी त्यांना वाहन थांबवायला सांगितले. त्यानंतर काही वेळाने प्रदीपचे मित्र तेथे आले. त्यांनी त्याला तातडीने जवळच्या खासगी इस्पितळात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
कॅब चालकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीपवर बँकाचे तीन ते चार लाख रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे तो चिंतित राहात होता. दोन वर्षापासून कॅब चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. प्रदीप यांच्यापश्चात व एक बावीस वर्षाचा मुलगा आहे. चालकांना विमा संरक्षण नसल्याने प्रदीपचे कुटुंबीय उघड्यावर आले आहे. ॲपवर आधारित कॅब चालकांच्या संघटनेने प्रदीपच्या कुटुंबीयांना शासनाकडून तसेच कॅब कंपनीकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली. यासंदर्भात एक निवेदन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले. यासंदर्भात ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांना भेटून तक्रार देण्यास त्यांनी सांगितले, असे संघटनेचे दीपक साने, हरीश उमरकर व अन्य सहकाऱ्यांनी सांगितले.