भाजपाला मत म्हणजे दिवंगत लक्ष्मण जगताप यांना मतः खासदार श्रीरंग बारणे सुद्धा प्रचारासाठी मैदानात
![A vote for BJP means a vote for the late Laxman Jagtap, MP Srirang Barane is also in the field for campaigning](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Shriran-Barane-780x470.jpg)
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी (दि. १५) वाकड भागात नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे हे सुद्धा प्रचारात मैदानात उतरले आहेत. चिंचवडमधील जनता सुज्ञ आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या विकासाला ते मत देतील आणि अश्विनी लक्ष्मण जगताप यांना एक लाखाच्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, माजी उपममहापौर झामाबाई बारणे, नानी घुले, भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, शिवसेनेचे माजी नगरसेवक निलेश बारणे, सामाजिक कार्यकर्त्या करिष्मा बारणे, सुरेश राक्षे यांच्यासह भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना मजबुतीने राज्याच्या गाडा हाकत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. या मजबूत सरकारला आपलीही तेवढीच साथ मिळायला हवी. चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना मतदान करावे. अश्विनी जगताप यांना मत म्हणजे लक्ष्मण जगताप यांना मत असणार आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्याची हीच खरी वेळ आहे. जनतेने अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.”
अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, “माझ्या पतीची आज जयंती होती. त्यांच्या आठवणी कधीच माझ्या मनातून जाणार नाहीत. आज जयंती असूनही ते दुःख बाजूला सारून प्रचारात उतरले आहे. चिंचवड मतदारसंघातील जनतेने अखंडपणे ४० वर्षे माझ्या पतीवर भरभरून प्रेम केले. त्यांच्या विकासाचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्यावी आणि भाजपाच्या कमळ चिन्हावर मतदान करून मला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.”