breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

जळगाव जिल्ह्यात दरोडा टाकण्यापूर्वीच नगरच्या तिघांना पोलिसांनी केली अटक; शस्त्रे जप्त

अहमदनगर : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात दरोडा टाकण्यासाठी गेलेल्या नगरच्या तीन अट्टल गुन्हेगारांना विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. आरोपींकडून तीन गावठी शस्त्र आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील त्यांचे दोन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. परप्रांतातून शस्त्रे आणायची आणि त्यांचा गुन्हेगारीसाठी वापर करायाचा अशीच येथील आरोपींची पद्धत झाली आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी याविरोधात आता विशेष मोहीम सुरू केली आहे.

महानिरीक्षकांच्या पथकाने चोपडा (जि. जळगाव) येथे शनिवारी रात्री गस्त घालताना संशयास्पदररित्या फिरणाऱ्या तिघांना पकडले. गणेश बाबासाहेब केदारे (रा.पाडळी ता.पाथर्डी जि. नगर), कालीदास दत्तात्रय टकले (रा. हरताला ता.पाथर्डी,जि. नगर), विकाश आप्पासाहेब गिरी ( रा.पाडळी ता.पाथर्डी,जि. नगर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. उमर्टी (मध्यप्रदेश) येथील त्यांचे दोन साथीदार फरार आहेत.

पोलिसांनी या तिघांची झडती घेतली. त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे, १४ राउंड, एक वस्तरा व एक स्कॉर्पिओ कार असा एकूण ६ लाख ३४ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. त्यांच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींना चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक बापू रोहम, सचिन जाधव, तसंच बशीर तडवी, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मंडलिक, नारायण लोहरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

  • आतापर्यंत २०० गुन्हे

परप्रांतातून आणलेल्या शस्त्रांच्या आधारे नगरसह शेजारील जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांनी गेल्या सात महिन्यांत याविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत परिक्षेत्रात बेकायदा शस्त्र बाळगल्याचे २०० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाईत १४५ गावठी कट्टे, २८२ तलवारी, ३५ सुरे जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये ३५० हून अधिक आरोपींवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे जेथून शस्त्र पुरवठा होतो, त्या मध्य प्रदेशातील बेकायदा शस्त्र कारखान्यापर्यंत पोलीस पोहचले आहेत. तेथून इकडे होणारा पुरवठा सध्या तरी बंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुन्हेगारी टोळ्या नियंत्रणासाठी आता ३५ टोळ्यांविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button