ताज्या घडामोडीमुंबई

भाजपच्या या ४ घोषणा म्हणजे ‘एप्रिल फूल’; राऊतांची जोरदार फटकेबाजी

मुंबई : महागाई आणि देशातील इतर प्रश्नांवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘केंद्र सरकारने जनतेला ‘एप्रिल फूल’ करत पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले आहेत. अच्छे दिन येणार, तुमच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होणार, दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार दिला जाणार आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार या सगळ्या घोषणा म्हणजे ‘एप्रिल फूल’च आहे,’ असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

नागपूरमधील वकील सतीश उके यांच्यावर झालेल्या कारवाईवरूनही संजय राऊत यांनी भाजपवर खरमरीत टीका केली. ‘सतीश उके यांनी काही चुकीचं केलं असेल तर महाराष्ट्र पोलीस तपास करतील. कारण ईडीकडून येऊन धाडी घालाव्यात असा कोणताही गुन्हा नाही. उके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जर फडणवीस-गडकरींवर चुकीच्या याचिका दाखल केल्या असतील तर त्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. अशा प्रकरणात दहशत निर्माण करण्यासाठी ईडीला आणलं जात आहे,’ असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

‘पाकिटमारांचा तपास करणं बाकी आहे’

केंद्रीय तपास यंत्रणांच्या भूमिकेचा संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. ‘अतिरेकी हल्ला करून निघून जातात, तशाच या देखील केंद्र सरकारकडून होणाऱ्या अतिरेकी कारवाया आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असून आता फक्त रेल्वेमधील पाकिटमारांचा तपास ईडी आणि सीबीआयने करायचा बाकी आहे,’ असं ते म्हणाले.

दरम्यान, ‘महाराष्ट्राच्या गृहखात्याने अधिक कठोर आणि सक्षम होण्याची गरज आहे. या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. केंद्रीय तपासयंत्रणांची घुसखोरी हे गृहखात्यावरील आक्रमण आहे. त्यामुळे गृहखात्यानेही शांत राहून चालणार नाही,’ असं म्हणत संजय राऊत यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचं अप्रत्यक्षपणे आवाहन केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button