ताज्या घडामोडीमुंबई

एसी लोकलचे तिकीट दर घटताच मुंबईकरांची गर्दी

मुंबई|मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीची धुरा एकहाती सांभाळणाऱ्या मुंबई लोकलमधील वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीचे तिकीट दर  कमी झाल्यानंतर प्रवाशांनी गारेगार प्रवासाला आपलेसे केले आहे. रेल्वे मंत्रालयाने वातानुकूलित व प्रथम श्रेणीचे तिकीट दर कमी केल्यानंतर पहिल्याच दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण ९,६५१ तिकिटांची विक्री झाली आहे. तर ११,९७८ प्रवाशांनी प्रवास केला. एरवी रिकाम्या धावणाऱ्या वातानुकूलित लोकल प्रवाशांनी भरून जात असल्याने रेल्वेच्या गारेगार, स्वस्त, वेगवान आणि आरामदायी प्रवासाला प्रवाशांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

‘सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर वातानुकूलित लोकलने प्रवास तासाभरात पूर्ण होतो, तोही १०५ रुपयांत. खड्डे, गतिरोधक यांमुळे बस, टॅक्सीऐवजी लोकलमध्ये बसून कार्यालयीन काम करणे खूपच सोयीचे झाले आहे. तिकीट दर कमी केल्याने रेल्वे प्रशासनाचे आभार’, अशी प्रतिक्रिया प्रवासी प्रतीक गोसावी यांनी दिली.

 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एप्रिल महिन्यात वातानुकूलित लोकल तिकीट विक्रीची रोजची सरासरी १,५१९ तर प्रथम श्रेणीची सरासरी १,३५३ इतकी होती. पाच मे दुपारी दोन वाजेपर्यंत वातानुकूलित २,३०८ तिकीट विक्री आणि २,१३२ प्रथम श्रेणीच्या तिकिटांची विक्री झाली आहे. पाच मेच्या संपूर्ण दिवसाची तिकीट विक्री दुसऱ्या दिवशी अर्थात सहा मे रोजी यंत्रणेवर उपलब्ध होईल. मात्र उपलब्ध आकड्यांनुसार तिकीट दर कमी झाल्याने वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी प्रवाशांची संख्या निश्चित वाढली आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेवर चार मे रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत वातानुकूलित २,००४ वातानुकूलित लोकलच्या तिकीट विक्री झाली होती. पाच मे दुपारी दोन वाजेपर्यंत यात वाढ होऊन वातानुकूलित तिकीट विक्रीची संख्या २,४४९ पर्यंत पोहोचली. प्रथम श्रेणीच्या तिकीट खरेदीलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला असून २,७६२ तिकिटांची विक्री झाली आहे.

वातानुकूलित लोकलचे तिकीट दर कमी झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी समाज माध्यमावर तिकिटांचा फोटो टाकून आनंद साजरा केला. समाज माध्यमातील अनेक समूहामध्ये प्रवाशांनी भरलेल्या वातानुकूलित लोकलचे फोटो व्हायरल झाले होते. यावेळी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणीही प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

वातानुकूलित लोकल फेऱ्यांची स्थिती

मध्य रेल्वे मुख्य मार्ग – ४४

हार्बर मार्ग – १६

पश्चिम मार्ग – २०

मध्य -पश्चिम एकूण लोकल फेऱ्या – ३,१८५

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button