breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमनोरंजन

मराठी रसिक जीवंत आहे तोवर नाटक संपणार नाही: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतर सोहळा : पिंपरी–चिंचवड शहरातील २५ दिग्गजांचा सत्कार

पिंपरी: प्रेक्षकांच्या निकट जो असतो तोच खरा अभिनेताअसतो. पूर्वी राजकीय नेत्यांना संमेलनात बोलावले की, टीका व्हायची पण आता चित्र बदलले आहे. आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स कडे संवेदनशिलता नाही. कितीही आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स आलं तरी संगीत, नाट्य, कला यावर परिणाम होणार नाही. आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स मानवी संवेदना देवू शकणार नाही. मराठी रंगभूमी ही सर्वोत्तम आहे. ती टिकवावी लागेल. शाश्वत मूल्य लक्षात घेवून 21 व्या शतकातील मूल्य ओळखावी लागतील. ओटीटी च्या काळात देखील नाटक संपलेलले नाही. जोवर मराठी रसिक जीवंत आहे तोवर नाटक संपणार नाही. असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतर सोहळा रविवारी चिंचवड येथे पार पडला, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद), नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, 100 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, पिंपरी चिंचवड महपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, कैलास कदम, शंकर जगताप, सचिन भोसले, धम्मराज साळवे, तुषार कामटे, सचिन चिखले, निलेश तरस, चेतन बेंद्रे, राजेंद्र मुथा, स्वप्नील कांबळे, चंद्रकांत लोढे, राजेंद्र जैन, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील, धारिवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रकाश धारिवाल आणि नाट्य परिषद नियमाक मंडळाचे पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पिंपरी – चिंचवड शहरातील २५ दिग्गजांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी सोलापूर नाट्य परिषदेकडे मान्यवरांच्या हस्ते नटराज आणि घंटा सुपूर्द करण्यात आली.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाटकाला केशराचं शेत म्हटले होते, मला वाटते शंभरावे नाट्य संमेलन हे केशराचं उद्यान असावं, केशरी रंग आम्हाला प्रिय आहे. सध्या देशाचा अमृतकाळ सुरू आहे, राज्याचा अमृतकाळ लवकरच सुरू होईल त्या काळात नाट्य क्षेत्र नक्की कुठे असेल याची कल्पना आम्हाला येणार नाही, मात्र तुम्ही नाट्य क्षेत्रातील लोकांनी आम्हाला सांगा नेमके व्हीजन काय असावे? ते पूर्णत्वास नेण्यास आम्ही पूर्ण सहकार्य करू.

दरम्यान, राज्यकर्त्या कडून नाट्य क्षेत्राचे प्रश्न सोडविण्यास उशीर होतो, मंत्रालयात फाइल्स पुढे सरकत नाहीत, त्या विलंबित तालात फिरतात त्याला द्रुत लयीत फिरवण्याची गरज असल्याचेही डॉ. पटेल यांनी सांगितले.

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे उत्तम कलाकार, उत्तम नाटक करतात. पण त्यांचे कार्यक्षेत्र जास्त आहे. ते रंगकर्मी असल्याने आम्ही त्यांना हक्काने काही मागू शकतो, असे म्हणत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले, नाट्यगृहांचे जे व्यवस्थापक नेमले जातात. ते वेगवगेळया विभागातून आलेले असतात . त्यांना नक्की तेथे काय काम अपेक्षित आहे हे बहुदा माहीत नसते. त्यामुळे जे जेष्ठ कलाकार आहेत. त्यांना नाट्यगृहांचे उपव्यवस्थापक म्हणून नेमण्यात यावे; तसेच नाट्यगृह बांधताना शासनाच्या समितीत एक जेष्ठ कलाकार असावा, अशी मागणी दामले यांनी प्रशासनाकडे केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, मोरया गोसावींची ही भूमी आहे. 27 वर्ष काम केल्याचे 100 वे नाट्य संमेलन हे फळ आहे. पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे पण पिंपरीला उप सांस्कृतिक राजधानी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. सर्वांच्या मदतीने हे नाट्य संमेलन यशस्वी झाले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन नरेश गडेकर यांनी मानले.

नाट्य क्षेत्रात बदल व्हावा, विकास व्हावा : सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाट्य क्षेत्रात बदल व्हावा, विकास व्हावा हा संकल्प घेऊन आम्ही इथे आलो आहोत. मराठी नाटकांवर आज काहीसे सावट असले तरी ते निश्चित दूर होईल यात शंका नाही. मराठी नाटक फक्त मनोरंजन करत नाही तर जगण्याची दिशा देते. तसेच डॉ. जब्बार पटेल यांनी बिनविरोध कसे निवडून यायचे हे सांगावे मी मंत्रालयातून फाइल्स कशा क्लियर करायच्या याचे गुपित सांगतो असे सांगत नाट्य क्षेत्राच्या, नाट्य गृहाचे प्रश्न सुटेपर्यंत आम्ही सत्ता सोडणार नाही अशी मिश्किल टिपणी केली.

विदेशातील रंगभूमीची भारतीयांना ओळख व्हावी : डॉ. जब्बार पटेल

डॉ. जब्बार पटेल म्हणाले, लहान मुलांमध्ये संवेदनशीलता, आकलन क्षमता जास्त असते त्यांना शाळेत कला विषय ज्ञान देण्याची गरज आहे, कारण आजची बालके मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. पुढे जाऊन त्यांना वाद्य, कला याचे ज्ञान मिळेल आणि ते प्रगल्भ होतील. तसेच नाट्य संमेलनात मल्याळम, कन्नड आणि बंगाली रंगभूमी वरील काही कार्यक्रम आणि विदेशातील फ्रेंच व जर्मन रंगभूमीची भारतीयांना ओळख करून द्यावी अशी अपेक्षा डॉ. पटेल यांनी व्यक्त केली.

वृद्धाश्रमासाठी राज्यसरकार मदत करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेकडे जमीन दिली आहे. त्या जमिनीवर वृद्धाश्रम करावे अशी मागणी परिषदेच्यावतीने सरकारला करण्यात आली. यावर आज बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘जेष्ठ कलाकारांचा आराखडा तयार करा, शासन त्या उपक्रमांसाठी मदत करेल’, असे आश्वासन दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button