Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

शिंदेंच्या बंडाचे ठाकरे मास्टरमाईंड? सोशल मीडियावरील चर्चांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर

मुंबई: राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे बंड हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला यावेळी त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला चांगलंच खडसावलं आहे. तसेच, एकनाथ शिंदेंना मी काय कमी केलं, नगरविकास खातं दिलं, माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपला रोष व्यक्त केला.

तसेच, सोशल मीडियावर हे सर्व उद्धव ठाकरेंचं षडयंत्र असल्याच्या ज्या चर्चा होत्या त्याही उद्धव ठाकरेंनी खोडून काढल्या आहेत. “माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडावरची फुलं न्या, फांद्या न्या, मूळ मात्र नेऊ शकत नाही. जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं. आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या चर्चांवर पाणी ओतलं.

एकनाथ शिंदेच्या बंडानंतर आज आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही मातोश्रीवरुन जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अत्यंत आक्रमकपणे या सर्व प्रकरणावर संताप व्यक्त केला.

नेमक्या चर्चा काय?

विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या रात्रीच एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले, ते काही आमदारांना घेऊन रस्तेमार्गे सूरतला गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सर्व प्रसारमाध्यमांवर आलं, त्यानंतर शिवसेनेच्या गटात खळबळ माजली. शिवसेनेने तातडीने आमदारांची बैठक बोलावली, सर्व परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरेंना ज्या आमदारांनी पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं. ‘उद्धव ठाकरे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा दिल्या. तेच आमदार दुसऱ्या दिवशी शिंदे गटात सामील झाल्याच्या बातम्या आल्या.

आमदारांवर नजर ठेवण्यात शिवसेनेला अपयश

शिवसेनेने शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचे अनेक प्रयत्न केले, काही प्रस्तावही दिले, मात्र शिंदे गटाने ते मान्य केले नाही. उलट तुम्हीच महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची ऑफर एकनाथ शिंदेंनी दिली. हे सर्व घडत असताना शिवसेना आपल्या आमदार, खासदारांवर नरज ठेवून होते. त्यांच्यासोबत वारंवार बैठका घेतल्या जात होत्या.

सूरतला एक दिवस राहिल्यानंतर शिंदे गटाने थेट गुवाहाटी गाठले. त्यानंतरही शिवसेनेच्या एक-एक आमदारांचं आऊटगोईंग सुरुच होतं. आता सध्याच्या स्थितीत शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ४० आमदार असल्याची माहिती आहे. गेल्या ४ दिवसांपासून बंडखोरीचं हे नाट्य सुरु आहे.

मुख्यमंत्रीच शिंदे बंडाचे मास्टरमाईंड?

पहिल्यादिवशी एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गेले हे कोणालाच माहिती नव्हते. मात्र, त्यानंतर सर्व माहिती असतानाही असे कसे शिवसेनेचे आमदार फुटले आणि थेट गुवाहाटीला पोहोचले, यावर संशय व्यक्त होऊ लागला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तर थेट हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचंच षडयंत्र असल्याचं सोशल मीडियावर बोललं गेलं. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच हे सर्व घडवून आणलं, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं. याला कारण म्हणजे एका पाठोपाठ एक आमदारांचं शिवसेनेच्या लोकांना गुंगारा देऊन शिंदे गटात सामील होणं. हे इतक्या मोठ्या प्रमाणात कसं शक्य आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

दादा भुसे, गुलाबराव पाटील, सदा सरवणकर शिंदे गटात

या बंडखोरांमध्ये उद्धव ठाकरेंच्या जवळचे अनेक लोक असल्याने शिवसेनेला याबाबत संशय कसा आला नाही, यावर विश्वास बसणे कठीण होते. शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्यांविरोधात शिवसेना भवनासमोर आंदोलन करणारे, घोषणाबाजी करणारे आमदार सदा सरवणकर हे देखील शिंदे गटात सामील झाले. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही गुवाहाटीचा रस्ता धरला. कृषिमंत्री दादा भुसे यांनीही बंडखोरी केली. यामुळे याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि प्रशासनाला कळलं कसं नाही असाही प्रश्न उपस्थित झाला.

दुसरीकडे, माध्यमांमध्ये अनेक बातम्या येऊ लागल्या. जेव्हा एकनाथ शिंदे हे रस्ते मार्गे सूरतला गेले तेव्हा गुजरातच्या सीमेपर्यंत त्यांना पोलिसांनी सुरक्षा दिल्याची बातमी आली. तसेच, एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना असल्याची माहिती होती, असंही सोशल मीडियावर फिरु लागलं. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आणि आज मुंबई पोलीस आयुक्तांशी मातोश्रीवर बैठकही केली. खासदार संजय राऊतांनीही पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे गटाने मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंपुढे त्यांची मागणी मांडावी, जर त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडायचे असेल तर त्यावर नक्कीच विचार होईल, असं म्हटलं. त्यामुळे या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं.

मात्र, या सर्व चर्चांना आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून खोडून काढलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज ज्या आक्रमकतेने आपली भूमिका मांडली त्यावरुन या सर्व फोल चर्चा असल्याचं दिसून येत आहे. आता राज्याचं राजकारण आणखी कुठलं वळण घेतं हे पाहावं लागणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button