TOP Newsताज्या घडामोडीपुणे

वेगवान मेट्रो प्रवासासाठी कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिग्नल सिस्टिमची चाचणी

पुणे : मेट्रोचा प्रवास वेगवान आणि सुरक्षित होण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाची अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिग्निलग सिस्टिमच्या (सीबीटीसी) चाचणीला सुरुवात झाली आहे. मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गिकेवर ही चाचणी सध्या सुरू असून या प्रणालीमुळे दर दोन मिनिटाला ट्रेन सोडणे शक्य होणार आहे. तसेच प्रत्येक ट्रेनमध्ये सुरक्षित अंतर ठेवून त्यांचे संचलन करणे शक्य होणार आहे. मेट्रो स्वयंचलित पद्धतीने धावणार असून ट्रेन सुरू करणे, तिचा वेग वाढविणे, ती फलाटावर नियोजित जागेवर थांबविणे ही सर्व कामे स्वयंचलित पद्धतीने होणार आहेत.

सीबीटीसी प्रणालीमध्ये रेडिओ कम्युनिकेशनद्वारे ट्रेनच्या स्थानाची, वेगाची आणि इतर अन्य महत्त्वाची माहिती ट्रेनमधील संगणकात उपलब्ध होणार आहे. ट्रेनच्या पुढे धावणाऱ्या आणि मागे असणाऱ्या ट्रेनची माहितीही सतत मिळत राहणार आहे. त्यामुळे दोन ट्रेन एकमेकांना धडकणे शक्य होणार नाही. काही कारणास्तव ट्रेन थांबली तर तिच्या मागील ट्रेन आपोआप सुरक्षित अंतरावर थांबणार आहे.

मेट्रोमधील सिग्निलग आणि ट्रेन कंट्रोल सिस्टिम सॉफ्टवेअरवर आधारित आहे. त्याची कमी आणि वेगवान चाचणी करण्याचे काम वनाज ते नळस्टॉप या विभागात होत असून यात एकाचवेळी तीन ट्रेन चालविण्यात येत आहेत. यामध्ये एका ट्रेनची माहिती मागे आणि पुढे चालणाऱ्या ट्रेनमध्ये व्यवस्थित प्रसारित होत आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. ट्रेन सुरू करणे, तिचा वेग वाढविणे, ती फलाटावर नियोजित जागेवर थांबविण्याची कामे स्वयंचलित पद्धतीने होणार आहेत.

सीबीटीसीची हायस्पीड ट्रेन चाचणी हा मेट्रोच्या पूर्णत्वाकडे जाणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याने या प्रणालीची निवड करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात पुणे मेट्रोचा विस्तार फुगेवाडी ते जिल्हा सत्र न्यायालय आणि गरवारे ते जिल्हा सत्र न्यायालय असा होईल. या विस्तारित टप्प्यात प्रवासी सेवा सुरू करण्यात येईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

या अत्याधुनिक प्रणालीमुळे दर दोन मिनिटाला ट्रेन सोडणे शक्य होणार असून प्रवाशांनाही सुरक्षित प्रवासाची खात्री मिळणार आहे. या प्रणालीमुळे जास्तीत जास्त ट्रेन चालविणे शक्य होणार आहे. प्रवाशांना ट्रेनच्या स्थानाची आणि वेळेची अचूक माहिती मिळणार आहे. तसेच ट्रेनचे स्वयंचलितरीत्या संचलन करणे शक्य होणार आहे. ट्रेन ऑपरेटर केवळ दरवाजे उघडणे आणि बंद करणे ही कामे करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button