महाराष्ट्रात दारू महागणार! नवे मद्यधोरण जाहीर, उत्पादन शुल्कात वाढ

मुंबई | महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महसूल वाढीसाठी नवं मद्यधोरण जाहीर केलं असून, मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे देशी आणि विदेशी दारूच्या किमतीत लक्षणीय वाढ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे राज्याच्या तिजोरीत सुमारे १४,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे.
नव्या दरवाढीचा तपशील:
भारतीय बनावटीचं विदेशी मद्य (IMFL): १.५ टक्के उत्पादन शुल्क वाढ. १८० मिली दारूची किंमत आता २०५ रुपये असेल.
प्रिमियम विदेशी ब्रँड: किंमतीत वाढ होऊन ३६० रुपये प्रति बाटलीपर्यंत पोहोचणार.
देशी दारू: ८० रुपये आणि महाराष्ट्र निर्मित दारू १४८ रुपये प्रति बाटली.
सीलबंद विदेशी मद्य: हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये भाडेतत्त्वावर विक्रीसाठी १० ते १५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार.
महाराष्ट्र निर्मित दारूसाठी नवी श्रेणी:
राज्य सरकारने ‘महाराष्ट्र निर्मित दारू’ ही नवी श्रेणी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे स्थानिक उत्पादनांना चालना मिळेल आणि राज्याच्या महसूलात आणखी वाढ होईल.
परवाना शुल्कातही वाढ:
मद्य विक्री परवान्याच्या नूतनीकरण शुल्कातही वाढ करण्यात येणार आहे. विदेशी दारूच्या आयातीवरील करात वाढीचा प्रस्ताव असून, यामुळे मद्यप्रेमींच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.





