विराट कोहली लवकरच मोठी खेळी करणार : राजकुमार शर्मा
![Virat Kohli to play big soon: Rajkumar Sharma](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Virat-Kohli.jpg)
नवी दिल्ली – भारताचा कर्णधार विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. त्याच्या नेतृत्वातील टीम इंडियाने मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली. मात्र कर्णधार विराट कोहलीच्या बॅटमधून म्हणावी तशी मोठी खेळी झालेली नाही. विराटच्या बॅटमधून नोव्हेंबर २०१९ नंतर एकही आंतरराष्ट्रीय शतक निघालेले नाही. पण, विराटचे लहानपणीचे प्रशिक्षकांनी विराट लवकरच मोठी खेळी करले असा विश्वास बोलून दाखवला.
राजकुमार शर्मा यांनी ‘मला माहीत आहे की विराट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. तो लवकर बाद होत आहे. असा पॅच क्रिकेटमध्ये सर्वसामान्य आहे. पण, विराट कोहली या पॅचमध्ये नाही तो लवकरच मोठी खेळी करेल.’ अशी प्रतिक्रिया एका वृत्तसंस्थेला दिली.
विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन डावात ४२ आणि २० अशा धावा केल्या होत्या. राजकुमार शर्मा यांनी सांगितले की, इंग्लिश गोलंदाजांना कोहलीचा कच्चा दुवा माहीत आहे. पण, विराट चांगली तयार करत आहे. तो लवकरच मोठी खेळी करेल.
शर्मा म्हणाले, ‘इंग्लंडमधील परिस्थिती वेगळी असते. गोलंदाजांना विराटचा कच्चा दुवा माहीत आहे. पण, विराट त्याच्यावर काम करत आहे. मी सांगतो की तो लवकरच मोठी खेळी करणार.’राजकुमार शर्मा यांनी भारतीय गोलंदाजांची स्तुती केली. ते म्हणाले, ‘आपल्याकडे आता दमदार गोलंदाजांची फळी आहे. ते भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावत आहेत. वेगवान गोलंदाजांना दुखापती काही नवीन नाहीत पण, आपल्याकडे बॅकअपसाठी वेगवान गोलंदाजांची मोठी फळी आहे.’
इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला होता. त्यानंतर लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत भारताने दमदार पुनरागमन केले. टीम इंडियाने इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला. आता तिसरा कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे उद्यापासून ( दि. २५ ऑगस्ट ) सुरु होत आहे.