ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजाराने निधन
द्वारकानाथ संझगिरी यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास, क्रीडा विश्वावर शोककळा
![Veteran, cricket, critic, Dwarkanath Sanjgiri, long, illness, passed away,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/drawakanath-780x470.jpg)
मुंबई : क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. द्वारकानाथ संझगिरी यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. ते लवकरच या आजारातून कमबॅक करत घरी परततील, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र त्यांची प्राणज्योत माळवली. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
समालोचक हर्षा भोगले यांची पोस्ट
द्वारकानाथ संझरगिरी यांच्या निधनाचं वृत्त समजताच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेट मराठमोळे समालोचक हर्षा भोगले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. भोगले यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हर्षा भोगले आणि द्वारकानाथ संझगिरी हे गेल्या अनेक दशकांपासूनचे मित्र होते. मात्र आपल्या मित्राच्या निधनानंतर हर्षा भोगले यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्याबाबतच्या आठवणी या जगासमोर मांडल्या आहेत.
हेही वाचा : प्रस्तावित ‘‘शिवनेरी’’ जिल्हाच्या मागणीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार- आमदार महेश लांडगे आमने-सामने!
क्रिकेट आणि सिनेमा
द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर अनेक पुस्तकं लिहिली होती.’ क्रिकेट कॉकटेल’, ‘क्रिकेटर्स मनातले’, अश्रू आणि षटकार, अफलातून अवलिये, फिल्मी कट्टा या आणि अशा अनेक पुस्तकांचं लेखन द्वारकानाथ संझगिरी यांनी केलं होतं. संझगिरी फेसबूकवर सातत्याने क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर विस्तृत आणि माहितीपूर्ण लिहायचे. त्यांच्या या लेखाचा एक वाचक आणि चाहतावर्ग होता. मात्र आता त्यांच्या निधनामुळे क्रिकेट आणि सिनेचाहत्यांना या अशा माहितीपूर्ण लेखाला मुकावं लागणार आहे.
अंत्यसंस्कार केव्हा?
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी 7 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.