Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडा

फलंदाजीसह सांघिक ताकदीची कसोटी; भारताची आज झिम्बाब्वेशी गाठ; यजमानांना विजय अनिवार्य, सॅमसनला संधीचे संकेत

चेन्नई : साखळी फेरीत कर्णधार सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि शिवम दुबे यांच्या एखाद-दुसर्‍या खेळीचा अपवाद वगळता फलंदाजीत संघर्ष करणार्‍या भारतीय संघाचे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हानच आता धोक्यात आले आहे. ‘अव्वल आठ’ फेरीत आज, गुरुवारी होणार्‍या झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत फलंदाजीसह भारताच्या सांघिक ताकदीची कसोटी लागणार आहे. आघाडीच्या फळीच्या अपयशामुळे चिंतेत असलेल्या भारतीय संघ व्यवस्थापनाने संजू सॅमसनला संधी देण्याची तयारी केल्याचे संकेत मिळत आहेत.

भारतीय संघाने साखळी फेरीत अमेरिका, पाकिस्तान, नामिबिया आणि नेदरलँड्स या चारही प्रतिस्पध्र्यांवर विजय मिळवले. मात्र, त्यानंतरही भारतीय फलंदाज पूर्णपणे लयीत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. ही चिंता ‘अव्वल आठ’ फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर अधिकच वाढली. विशेषत: किशन, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा हे अव्वल तीनही फलंदाज डावखुरे असल्याचा भारताला मोठा फटका बसला.

साखळी फेरीतील अखेरच्या दोन सामन्यांत पाकिस्तानचा सलमान अली आघा आणि नेदरलँड्सचा आर्यन दत्त या ऑफ-स्पिन गोलंदाजांनी अभिषेक शर्माला पहिल्या षटकात शून्यावर माघारी धाडले. मग ‘अव्वल आठ’ फेरीतील पहिल्या सामन्यात भारताने नियोजन थोडे बदलून या वेळी किशनला स्ट्राइक घ्यायला लावली. परंतु निकाल तोच राहिला. ऑफ-स्पिनर एडीन मार्करमने किशनला डावाच्या पहिल्या षटकात बाद केले. किशनही खाते उघडू शकला नाही. झिम्बाब्वेच्या संघात कर्णधार सिकंदर रझाच्या रूपात ऑफ-स्पिन गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध आहे. हेच लक्षात घेत भारतीय संघाने अभिषेकच्या साथीने सॅमसनला सलामीला खेळविण्याचे जवळपास निश्चित केले आहे.

चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर होणार्‍या या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी भारताच्या फलंदाजी क्रमात बदल होणे अपेक्षित आहे. अभिषेक आणि सॅमसन सलामीला खेळतील, तर इशान तिसर्‍या, कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या आणि तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. वडील आजारी असल्याने रिंकू सिंह घरी परतला होता. त्याने बुधवारी पुन्हा चेन्नई गाठले. मात्र, आता सॅमसनला संधी देण्याचे ठरल्याने रिंकूला बाहेर बसावे लागू शकेल.

हेही वाचा –  फळेच नाही तर सालही शरीर निरोगी ठेवण्यास करते मदत… 7 दिवसांत जाणवेल मोठा फरक

साखळी फेरीत चेपॉकची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल ठरली होती. मात्र, यावेळी खेळपट्टीकडून फिरकीला मदत मिळण्याची शक्यता आहे. चेपॉक येथील मैदान कर्मचारी एरवी खेळपट्टी पूर्णपणे आच्छादित ठेवतात. मात्र, भारत-झिम्बाब्वे सामन्याच्या एक दिवस आधी, विशेषत: दुपारपासून खेळपट्टीवर कोणतेही ‘कव्हर’ नव्हते. खेळपट्टीला अधिकाधिक ऊन लागावे हा यामागचा हेतू होता. त्यामुळे खेळपट्टी अधिक कोरडी असण्याची शक्यता असून याचा फिरकीपटूंना फायदा मिळू शकेल. अशा वेळी उपकर्णधार अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती भारतासाठी निर्णायक भूमिका बजावतील. तसेच तिलक वर्माची कामचलाऊ फिरकीही महत्त्वाची ठरू शकेल. झिम्बाब्वेच्या फिरकीची मदार कर्णधार रझा आणि ग्रॅहम क्रिमर यांच्यावर असेल.

फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला ‘चेपॉक’ या आपल्या घरच्या मैदानावर प्रथमच ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. २०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अपयशानंतर तीन वर्षे भारतीय संघाबाहेर राहिलेल्या चक्रवर्तीने आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी पुनरागमन केले आहे. जसप्रीत बुमरासह तो भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ ठरतो आहे. आता घरच्या प्रेक्षकांसमोर चमकदार कामगिरीचा त्याचा मानस असेल. गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चक्रवर्तीला लक्ष्य केले होते. त्यामुळे त्याच्यासमोर काही प्रश्न उपस्थित राहिले असून त्यांची उत्तरे शोधण्यास तो प्रयत्नशील असेल.

’ ‘अव्वल आठ’ फेरीतील पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भारताची निव्वळ धावगती -३.८०० अशी झाली.

’ आता स्पर्धेतील आव्हान शाबूत ठेवण्यासाठी भारताला झिम्बाब्वेविरुद्ध विजय अनिवार्य असून निव्वळ धावगतीवरही लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी प्रथम गोलंदाजी करणे भारताला अधिक फायद्याचे ठरेल.

’ भारताला आपली निव्वळ धावगती सकारात्मक करायची झाल्यास झिम्बाब्वेला १५० धावांवर रोखून लक्ष्य ११ षटकांत गाठावे लागेल. तसेच झिम्बाब्वेने १८० धावा केल्या तर भारताला त्या ११.४ षटकांत, २०० धावा केल्या तर त्या १२.२ षटकांत कराव्या लागतील.

’ तसेच भारतीय संघ आज दुपारी होणार्‍या दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज लढतीवरही लक्ष ठेवून असेल. या लढतीत दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आणि नंतर भारताने झिम्बाब्वेचा पराभव केला तर समीकरण स्पष्ट होईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी होणारी ‘अव्वल आठ’ फेरीची अखेरची लढत निर्णायक ठरेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

द्विदेशीय मालिकांमध्ये आमचे फलंदाज चमकदार कामगिरी करत होते. मात्र, या विश्वचषकात आम्हाला तितकेसे यश मिळालेले नाही. विशेषत: गेल्या सामन्यातील (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) कामगिरी चिंताजनक होती. परंतु हा बहुधा गेल्या दोन वर्षांतील आमचा सर्वांत वाईट सामना होता. असे कधी तरी घडते. आम्ही त्याबाबत फार विचार न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे.

 – सितांशू कोटक, भारताचे फलंदाजी प्रशिक्षक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button