टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटर ऋषी धवनची निवृत्तीची घोषणा
भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीची सध्या चर्चा
![Team, India, all-rounder, cricketer, Rishi Dhawan, retirement, announcements,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/cricet-780x470.jpg)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीची सध्या चर्चा सुरू आहे. नुकतंच आर अश्विनने निवृत्ती घेतल्यानंतर विराट, रोहितच्या निवृत्तीच्या अफवा जोर धरू लागल्या आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत दोन्ही दिग्गज सपशेल अपयशी ठरले. दरम्यान, दोघांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू असतानाच एका भारतीय खेळाडूने निवृत्तीची घोषणा केलीय. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून ऋषी धवन याने निवृत्ती घेतलीय. विजय हजारे ट्रॉफीत हिमाचलच्या संघाने विजय मिळवताच ऋषी धवनने आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचा कर्णधार आणि टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटर ऋषी धवनने सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ३४ वर्षीय धवनने म्हटलं की, भारतीय क्रिकेटमधून मर्यादित षटकांच्या प्रकारातून निवृत्ती घेत आहे. आता तो विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. मात्र, प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळत राहील.
टीम इंडियाकडून ऋषी धवनला फारशी संधी मिळाली नाही. २०१५ मध्ये एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केलं. २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला ३ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यात त्याला फक्त १२ धावा करता आल्या. तर एकच विकेट घेता आली होती.
टी२०मध्ये एकमेव सामना झिम्बॉब्वेविरुद्ध खेळला होता. यात त्याला एक धाव काढता आली होती. तर एक विकेट घेतली होती. लिस्ट ए करिअरमध्ये धवनने १३४ सामन्यात २९०६ धावा आणि १८६ विकेट घेतल्या. तर १३५ टी२० सामन्यात १७४० धावा केल्या आणि ११८ विकेट घेतल्या आहेत.