‘रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाचं नेतृत्त्व करू नये’; सुनील गावसकरांचे वक्तव्य
![Sunil Gavaskar said that Rohit should not lead the team on the Australia tour](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Sunil-Gavaskar--780x470.jpg)
Rohit Sharma | नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत टीम इंडियाचा ०-३ अशा फरकाने पराभव झाला. यानंतर आता भारतीय संघ काही दिवसांत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. जिथे दोन्ही संघांत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. या मालिकेपूर्वी सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. याबाबत विचारलं असता, सुनील गावस्कर म्हणाले, कर्णधाराला पहिली कसोटी खेळणे आवश्यक आहे. त्याला दुखापत झाली असेत तर प्रश्न वेगळा आहे, पण संघाचा कर्णधार पहिल्याच सामन्यात उपलब्ध नसताना उपकर्णधारावर जो दबाव निर्माण होतो तो वेगळाच दबाव असतो. त्याला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणे सोपे जाणार नाही.
हेही वाचा – आमदार महेश लांडगे यांच्यामुळे सरसकट शास्तीकर मुक्ती!
मलाही नक्की माहित नाही, रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार की नाही, आम्ही पण याबद्दल वाचत आहोत. मी असही वाचलं की तो कदाचित दुसऱ्या कसोटीतही खेळणार नाही. असं असेल तर अजूनही भारतीय निवड समितीकडे वेळ आहे. अजित आगरकरने त्याला सांगावं की बघ, तुला जे काही करायचे आहे, आराम कर, विश्रांती घ्या, तुमचे वैयक्तिक कारण काहीही असेल. जर तू २-३ कसोटी सामने खेळणार नसशील तर एक खेळाडू म्हणून या दौऱ्यावर जावे. मग दुसऱ्या, तिसऱ्या कसोटीत कधीही संघात सामील हो. पण आम्ही या दौऱ्याचा कर्णधार बदलू आणि उपकर्णधाराला कर्णधार बनवू कारण स्पष्टता असली पाहिजे. कर्णधारपदाची जबाबदारी आहे. विशेषत: ३-० ने संघ हरला असताना या मालिकेत कर्णधाराची आवश्यकता आहे, असंही सुनील गावस्कर म्हणाले.