SA vs IND : दक्षिण आफ्रिकेला 197 धावांतच गुंडाळले! मोहम्मद शमीचे 5 बळी
![SA vs IND: South Africa were bowled out for 197! 5 victims of Mohammed Shami](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/mohammed-shami-tests.jpg)
सेंच्युरियन | टीम ऑनलाइन
भारत-दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसर्या दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेला 197 धावांत गुंडाळून भारताने या सामन्यावरील आपली पकड घट्ट केली आहे. तिसर्या दिवसअखेर 146 धावांची आघाडी भारताकडे आहे. तिसर्या दिवशी तब्बल 18 फलंदाज बाद झाले. भारताचा पहिला डाव अवघ्या 327 धावांत संपला. भारताचे राहिलेले 7 फलंदाज आज अवघ्या 55 धावांची भर घालून झटपट माघारी परतले. नाबाद शतकी खेळी करणारा राहुल अवघी 1 धावा काढून लगेचच बाद झाला. तर रहाणेनेदेखील आणखी 8 धावांची भर घालून परतीचा रस्ता धरला.
आफ्रिकन वेगवान गोलंदाज निगडीने 6, रबाडाने 3 आणि जेन्सनने 1 बळी घेतला. निगडीने आपल्या कारकीर्दित तिसर्यांदा 5 किंवा जास्त बळी घेण्याचा पराक्रम केला. योगायोग म्हणजे त्याने याच मैदानावर 2017-18 मध्ये झालेल्या कसोटीत 6 बळी घेतले होते. यष्टिरक्षक डिकॉकने यष्टिमागे 4 झेल टिपले. शमीच्या सुरेख मार्यासमोर आफ्रिकेचा डाव 62.3 षटकांत चहानानंतर 197 धावांतच आटोपला. त्यांच्या बाऊमाने सर्वाधिक 52 धावा केल्या. आपले कसोटीतील 16 वे अर्धशतक फटकावताना त्याने 103 चेंडूंचा मुकाबला केला. त्याने 10 चौकार मारले. यष्टिरक्षक डिकॉकने 34 आणि रबाडाने 25 धावा केल्या. डिकॉक-बाऊमाने 5 व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून त्यांचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला 4 बाद 32 धावा अशी त्यांची बिकट अवस्था झाली होती. यष्टिरक्षक पंतनेदेखील यष्टिमागे 4 झेल टिपले. तसेच त्याने कसोटीतील यष्टिमागे 100 बळींचे शतक साजरे केले. भारतातर्फे अवघ्या 26 कसोटीत त्याने हा पराक्रम करून नवा विक्रम केला. त्याने धोनी-साहाचा अगोदरचा 36 कसोटीतील बळींचा शतकांचा विक्रम मोडीत काढला. दिवसअखेर भारताने दुसर्या डावांत सलामीवीर अग्रवालचा बळी गमावून 1 बाद 16 धावांची मजल मारली.