आयपीएलमधील महत्त्वाच्या समित्यांवर राहुल द्रविडची नियुक्ती, बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय
![Rahul Dravid's appointment to key committees in IPL, BCCI Annual General Meeting to decide](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/LO82-780x461.jpg)
राहुल द्रविडवरचा विश्वास बीसीसीआयने पुन्हा व्यक्त करत त्याच्यावर आयपीएलमधील प्रमुख समित्यांची जबाबदारी सोपवली आहे. बऱ्याच काळापासून राहुल द्रविड आयपीएल पासून लांब होता. मागील चार वर्षापासून त्याने कोणतेही काम पाहिले नव्हते. मात्र, आता त्यांचा आयपीएलच्या दोन समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यांचा समावेश मागील वर्षीच या समित्यांमध्ये करण्यात आला होता. मात्र, यासंबंधीची गुप्तता पाळली गेलेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या तीन समित्यांपैकी दोन समित्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
सौरव गांगुली आणि जय शाह यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता येथे झालेल्या बीसीसीआयच्या शेवटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत द्रविड यांचा लीगच्या आचारसंहिता समिती आणि तांत्रिक समितीत समावेश करण्यात आला असून नुकत्याच राज्य संघटनांना पाठवल्या गेलेल्या एजीएमच्या पत्रकांमध्ये राहुल द्रविड यांच्या नावाचा उल्लेख आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ९ हजार कोटींहून अधिक निधी न्यायिक खटल्यात रोखला होता याचाही या पत्रकात उल्लेख आहे. बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनांकडील ९,००० कोटींहून अधिक निधी अनुत्पादक आणि अनुचित खटल्यात अडकला आहे. याचा उपयोग चांगल्या सुविधांसह खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
तसेच, मागील तीन वर्षांपासून बीसीसीआयच्या समालोचकांच्या पॅनेलमधून बाहेर असलेले संजय मांजरेकर यांचे पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत ते समालोचन करताना दिसतील. २०२० मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर मांजरेकर यांना वगळण्यात आले होते. पण त्याच यावर्षी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठी त्यांचा या पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे.