मुंबई रणजी संघात डोंबिवली मधील क्रिकेटपटू गुरवची निवड
श्रेयस उत्कृष्ट स्पीनर गोलंदाज, वर्षभरात 84 फलंदाजांच्या दांड्या गुल

डोंबिवली : मुंबई रणजी संघात डोंबिवली मधील क्रिकेटपटू श्रेयस गुरव याची निवड झाली आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासून श्रेयसने क्रिकेट प्रशिक्षक राजन धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करण्यास सुरुवात केली. श्रेयस हा उत्कृष्ट स्पीनर गोलंदाज असून गेल्या वर्षभरात त्याने 84 फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत. रणजी संघात त्याची निवड झाल्याने प्रशिक्षक धोत्रे व सहकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.
मुंबई रणजी संघात निवड झालेला श्रेयस गुरव हा डोंबिवली पूर्वेतील सारस्वत काॅलनीमध्ये रहातो. स. वा. जोशी शाळेचे ते विद्यार्थी आहेत. बालपणापासून श्रेयस यांना क्रिकेट खेळण्याची आवड होती. इयत्ता चौथीमध्ये असल्यापासून श्रेयस यांनी डोंबिवलीतील क्रिकेट प्रशिक्षक राजन धोत्रे यांच्याकडे क्रिकेट प्रशिक्षणाला सुरूवात केली.
या प्रशिक्षणातून श्रेयस यांना क्रिकेटमधील अष्टपैलु खेळाचे मार्गदर्शन मिळाले. अथक मेहनत, कष्ट करण्याची तयारी या सर्व गुणांवर मात करत श्रेयस यांनी रणजी संघातील निवडीचा मोलाचा पल्ला गाठला, असे प्रशिक्षक धोत्रे यांनी सांगितले.
श्रेयस सुरुवातीला वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जायचे. नंतर त्यांनी त्यांची गोलंदाजीची पध्दत हळुहळू बदलली. आता ते स्पीनर गोलंदाज म्हणून ओळखले जातात. ते डावखुरा गोलंदाज असून श्रेयस मुंबईतील कीर्ति महाविद्यालय, एमआयजी क्लबतर्फे खेळले आहेत. गेल्या वर्षभरात श्रेयस यांनी 84 फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत. हे कौतुकास्पद आहे, अशी माहिती प्रशिक्षक धोत्रे यांनी दिली.
हेही वाचा – हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसकडून जिल्हा परिषद शाळेस डिजिटल स्मार्टबोर्ड
क्रिकेटमध्ये मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रेयस यांचा रणजी संघ निवडीच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. या क्षणाची श्रेयस यांचे प्रशिक्षक, सहकारी क्रिकेटपटू वाट पाहत होते. अखेर मुंबई रणजी संघात श्रेयस यांची निवड झाली.
श्रेयस यांची मुंबई रणजी संघात निवड व्हावी यासाठी प्रत्येकाची इच्छा होती. अखेर त्या इच्छेप्रमाणे ही निवड झाल्याने श्रेयस यांचे क्रिकेटमधील डोंबिवलीतील ज्येष्ठ प्रशिक्षक राजन धोत्रे आणि सहकारी मित्रांनी समाधान व्यक्त केले आहे.
रणजी संघात निवड झालेले श्रेयस हे चौथे डोंबिवलीकर आहेत. यापूर्वी स.वा.जोशी शाळेतील नीलेश कुलकर्णी, अजिंक्य राहणे तर पाटकर शाळेतील मनीष राव यांची रणजी संघात निवड झाली होती. या तिन्ही क्रिकेटपटुंप्रमाणेच श्रेयस हे देखील रणजीमध्ये दमदार खेळी करतील, असा विश्वास त्यांच्या सहकार्यांना वाटतो.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
श्रेयस हे मेहनती क्रिकेटपटू आहेत. ते डावखुरे गोलंदाज आहेत. त्यांची मुंबई रणजीमध्ये निवड व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा होती, त्याप्रमाणे घडले. ते या निवडीला आपल्या दमदार खेळीतून न्याय देतील. त्यांना पुढे जशा संधी मिळतील त्याप्रमाणे त्यांना या खेळात उज्जवल भवितव्य आहे.
– राजन धोत्रे, ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक, डोंबिवली.