“मी भारताला ट्रॉफी परत करण्यास तयार, पण..”; मोहसीन नक्वींनी ठेवली ‘ही’ मोठी अट

Mohsin Naqvi | भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (२८ सप्टेंबर) दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आशिया चषक २०२५ अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने रोमांचक पराभव करत नववी वेळा ट्रॉफीवर आपले नाव कोरले. मात्र, अंतिम सामन्यांनंतर एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिल्यानंतर एक वेगळेच नाट्य घडले आणि नक्वी ट्रॉफी आणि भारतीय संघाची पदके घेऊन तिथून निसटले. दरम्यान, बीसीसीआयने भारताची ट्रॉफी आणि पदके परत करावीत, अशी मागणी केल्यानंतर आता नक्वी यांनी एका अटीवर यासाठी तयारी दर्शवली आहे.
PCB प्रमुख मोहसीन नक्वी यांनी अखेर आशिया चषक ट्रॉफी भारताला देण्याची सहमती दर्शविली आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक मोठी अट ठेवली आहे. ट्रॉफी सादरीकरणासाठी पुन्हा एकदा एक समारंभ आयोजित करा अशी त्यांची मागणी आहे. सध्या तरी भारतीय संघ आणि BCCI कडून असा कोणताही समारंभ होण्याची शक्यता कमी असल्याने ट्रॉफीवरून हा वाद आगामी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : बारावी परीक्षेची ऑनलाईन आवेदन पत्रे भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना शासनाचा दिलासा
कर्णधाराने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे हे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन असू शकते असे मानले जात आहे. जरी याबाबत कोणताही विशिष्ट नियम नसला तरी हे कृत्य क्रिकेटच्या भावनेविरुद्ध असल्याचे मानले जाते. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याला ट्रॉफी न स्वीकारण्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागेल आणि त्यानंतर स्पर्धा संस्था किंवा ICC या घटनेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का ? याबाबत तपास करून दंड आकारणीबद्दल निर्णय घेऊ शकते.





