तुकाराम मुंढेंची बदली होणार नाही! मंत्री झिरवाळांची सर्वपक्षीय आमदारांना ग्वाही

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी बुधवारी सर्वपक्षीय सदस्य एकवटले. आजवर विभागाला अनेक आयुक्त मिळाले. पण, असे काम कुणीच केले नाही. त्यामुळे मुंढेंची तीन वर्षे बदली करू नका, अशी आग्रही मागणीही सर्वपक्षीय सदस्यांनी केली.
संत तुकाराम आणि संत नरहरी सोनार हे वारकरी सांप्रदायातील गुरुबंधू होते, वंदनीय सहयात्री होते. आता आयुक्त तुकाराम आणि मंत्री नरहरी यांनी सहयात्री होऊन भेसळ रोखावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
एफडीला चर्चे आणणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे मनापासून कौतुक करतो, त्यांची काळजी घ्या. त्यांच्या बदलीसाठी तुम्ही प्रयत्न करीत नाही, म्हणून तुमचेही अभिनंदन करतो. भेसळखोरांवर केलेल्या कठोर कारवाईमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. समाज माध्यमांवरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यांना संरक्षण द्या. त्यांची तीन वर्षे त्यांची बदली करू नका, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.
मुंढे यांना मनापासून आभार व्यक्त करतो. अनेक खाद्य पदार्थांच्या भेसळीवर कारवाई सुरू आहे. त्यांचे पथक अत्यंत वेगाने काम करीत आहे. विभागाला मंजूर निधी पूर्ण मिळावा, अशी मागणी आम्ही विरोधी बाकावर असूनही मुख्यमंत्र्यांकडे करू, असे नाना पटोले म्हणाले.
लहान मुलांना कर्करोग होत आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाच्या धडाडीमुळे हे खाते पहिल्यांदा चर्चेत आले आहे. राज्याच्या अनेक भागांत गुटखा बंद झाला आहे. मुंढे यांनी जे केले ते त्यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी का केले नाही. मागील अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली.
मुंढे आणि झिरवाळ यांनी समन्वयाने काम सुरू केल्यामुळे एफडीए चर्चेत आले आहे. जिथे कारवाई करतो, तो पुन्हा पुन्हा सापडतो, त्यावर ठोस कारवाई होत नाही, असे सुनील शेळके यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर संबंधितांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करणार असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले.





