IPL 2026 KKR vs PBKS: ईडन गार्डन्सवर पावसाचे सावट; कोलकाता नाईट रायडर्सला खातं उघडण्यासाठी अजून वाट बघावी लागणार?

IPL 2026 KKR vs PBKS Rain: आयपीएल २०२६ च्या हंगामात आज ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) हे दोन तगडे संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र, या हाय-व्होल्टेज सामन्यावर पावसाचे काळे ढग जमा झाले असून, कोलकात्याच्या लहरी हवामानामुळे क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येलाच पावसाने हजेरी लावल्यामुळे दोन्ही संघांच्या सराव सत्रावर परिणाम झाला. मैदानावर कव्हर्स असल्याने खेळाडूंना मैदानी सराव करता आला नाही. विशेषतः सलग दोन पराभवानंतर पुनरागमनासाठी सज्ज असलेल्या केकेआरला इनडोअर सराव करावा लागला. त्यातच त्यांचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर आता प्रतिस्पर्धी संघात असल्याने, या रणनीती आखण्याच्या काळात पावसाचा अडथळा केकेआरसाठी डोकेदुखी ठरू शकतो.
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, ६ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान कोलकात्यात ‘कालवैशाखी’ वादळाचा प्रभाव जाणवणार आहे. सामन्याच्या वेळी म्हणजेच संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान पावसाची शक्यता ४० टक्के आहे, जी रात्री ९ वाजेपर्यंत ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा – Constant Hunger After Eating | पोटभर जेवल्यानंतरही भूक लागतेय?
जरी पावसाचे सावट असले, तरी ईडन गार्डन्सची ‘ड्रेनेज सिस्टम’ (पाणी उपसा करण्याची व्यवस्था) देशातील सर्वोत्तम मानली जाते. पाऊस थांबल्यानंतर अवघ्या काही वेळातच मैदान खेळण्यायोग्य करण्याची क्षमता येथे आहे. तसेच, संपूर्ण मैदान झाकण्यासाठी लागणारे कव्हर्सही सज्ज ठेवण्यात आले आहेत.
तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असून हवेत ७० टक्के आर्द्रता असेल. जर पावसाने सुरुवातीच्या काळात व्यत्यय आणला, तर सामन्यातील ओव्हर्सची संख्या कमी केली जाऊ शकते. मात्र, पाऊस सतत सुरू राहिल्यास सामना रद्द होण्याचीही भीती नाकारता येत नाही.
२०२४ मध्ये पंजाबने याच मैदानावर २६२ धावांचा पाठलाग करून विक्रम रचला होता, तर गेल्या हंगामात कमी धावसंख्येचा बचाव करून सर्वांना चकित केले होते. त्यामुळे यावेळच्या ‘टक्कर’मध्ये वरुण राजा काय भूमिका बजावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





