IPL 2020 : सनरायझर्स हैदराबादकडून राजस्थानचा आठ विकेट्सनी पराभव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/rr-vs-srh.jpg)
दुबई – गुरुवारी दुबईत झालेल्या आयपीएल 2020च्या चाळीसाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला. राजस्थानने दिलेले 154 धावांचे आव्हान हैदराबादने 18.1 षटकांत पार केले. हा हैदराबादचा चौथा विजय ठरला असून यासह संघाने पाचव्या स्थानी झेप घेत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. हैदराबादच्या या विजयाचा हीरो मनीष पांडे ठरला असून त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून हैदराबाद संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत 6 विकेट्स गमावत 154 धावा केल्या होत्या. हैदराबादकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या जेसन होल्डरने 33 धावात तीन विकेट्स घेतल्या. तर लेग स्पिनर रशिद खाननेही 20 धावांत एक विकेट घेऊन त्याला सुरेख साथ दिली. राजस्थानच्या संजू सॅमसनने सर्वाधिक 36 धावांचे योगदान दिले. बेन स्टोक्सने 30, रियान परागने 20, स्टीव्ह स्मिथने 19, रॉबिन उथप्पाने 19 आणि जोफ्रा आर्चरने 16 धावा केल्या.
राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर अवघ्या चार धावांवर बाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टॉदेखील 10 धावांवर बाद झाला. हेदराबादची 2 बाद 16 अशी अवस्था असताना मनीष पांडे आणि विजय शंकर मैदानात उतरले आणि शेवटपर्यंत नाबाद राहिले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने दोन विकेट घेतल्या.