IPL 2020 : आज हैदराबाद-राजस्थान आमनेसामने येणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/fasegdfgn.jpg)
दुबई – आयपीएलच्या 13व्या हंगामातील 40वा सामना आज रंगणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये दुबईत सायंकाळी साडे सात वाजता ही लढत पार पडणार आहे. दोन्ही संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे आज कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यंदाच्या स्पर्धेत सनरायझर्स आठ गुणांसह गुणतालिकेत तळातून दुसऱ्या स्थानी आहे, तर मागील लढतीत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळविणारा राजस्थान रॉयल्स संघ त्याच्यापेक्षा एका स्थानाने पुढे आहे. आता हैदराबाद संघाला प्ले-ऑफच्या आशा कायम राखण्यासाठी उर्वरित पाच सामने जिंकावे लागतील तर राजस्थान संघ विजयी आगेकूच कायम राखण्यास प्रयत्नशील असेल.
दरम्यान, राजस्थानकडून अनुभवी फलंदाज जॉस बटलर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. बटलरने 9 सामन्यात 262 धावा केल्या आहेत आणि स्मिथने 10 सामन्यात 246 धावा केल्या आहेत. तर वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, फिरकीपटू राहुल तेवतियाने सर्वाधिक बळी घेतले आहेत. आर्चरने 10 सामन्यांत 13 गडी बाद केले आहेत, तर तेवतियाने 7 बळी घेतले आहेत. तसेच हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि सलामीवीर जॉनी बेयरस्टो यांनी या हंगामात आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. वॉर्नरने 9 सामन्यांत 331 आणि बेअरस्टोने 9 सामन्यांत 316 धावा केल्या आहेत. तर फिरकीपटू राशिद खान आणि मध्यमगती गोलंदाज टी नटराजन यांनी या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. रशीदने 10 सामन्यांत 13 तर नटराजनने 9 सामन्यांत 11 गडी बाद केले आहेत.