#INDvsENG आज भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा ट्वेन्टी-२० सामना
![#INDvsENG Today is the second Twenty20 match between India and England](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/701527-india-vs-england-t20i-series-pti.jpg)
अहमदाबाद – भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टी-२० सामना आज रंगणार आहे. सलामी सामना जिंकून इंग्लंड संघाने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० ने आघाडी घेतली असून भारताला सलामी सामन्यातील पराभवाने माेठा धक्का बसला आहे. मात्र एका पराभवाने मालिकेतील आव्हान संपुष्टात येत नाही. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजीत सुधारणेचे आव्हान भारतापुढे असेल.
तीन महिन्यांनंतर प्रथमच भारतीय संघ शुक्रवारी खेळलेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यात के. एल. राहुल, हार्दिक पंड्या आणि यजुर्वेंद्र चहल यांच्यासारखे टी-२० क्रिकेटमधील तारांकित खेळाडू अपयशी ठरले. परिणामी इंग्लंडने भारताविरुद्ध सर्व विभागांत मात केली. दरम्यान, ऋषभ पंत आणि पंड्याकडून स्फोटक व मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, असे कर्णधार विराट कोहली याने सांगितले. पहिल्या सामन्यात पंतने २१ आणि पंड्याने १९ धावा केल्या. तसेच भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर आणि हार्दिकवर वेगवान माऱ्याची, तर अक्षर पटेल, चहल आणि वॉशिंग्टन सुंदरवर फिरकीची भिस्त होती.
पहिल्या सामन्यात राहुल, शिखर धवन आणि विराट ही आघाडीची फळी कोसळली. मात्र श्रेयस अय्यरने ४८ चेंडूंत ६७ धावांची खेळी साकारत आपली भूमिका चोख बजावली. परंतु जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्या वेगवान माऱ्यापुढे भारताला एकंदर धावांचा वेग राखता आला नाही. त्यामुळे २० षटकांत ७ बाद १२४ एवढीच धावसंख्या भारताला उभारता आली. दरम्यान, भारताचा डावखुरा सलामीवीर फलंदाज धवनला काही सामन्यांत अजमावण्यासाठी अनुभवी उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. परंतु पहिल्या सामन्यात धवन (१२ चेंडूंत ४ धावा) पूर्णत: अपयशी ठरला. त्यामुळे धवनवर कितपत विसंबून राहायचे, हा प्रश्न संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागेल.
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, थंगरासू नटराजन.
इंग्लंड संघ
ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स, आदिल रशीद, रीस टॉप्ली, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, टॉम करन, मार्क वूड, जोफ्रा आर्चर.