#INDvsENG भारताचा इंग्लंडवर ७ विकेट्सने दणदणीत विजय
![#INDvsENG India beat England by 7 wickets](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/ind-vs-eng-1.jpg)
अहमदाबाद – भारत आणि इंग्लडदरम्यान पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला. या सामन्यात भारताने सात विकेट्स राखून इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
2nd T20I. It's all over! India won by 7 wickets https://t.co/gU4AGpZy2O #INDvENG @Paytm
— BCCI (@BCCI) March 14, 2021
रविवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने भारताला १६५ धावांचे लक्ष्य दिले होते. हे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. आघाडीचा फलंदाज के एल राहुल शुन्यावर बाद झाल्याने भारतीय संघाला पहिला मोठा झटका बसला. तेव्हा भारतीय संघाने आपलं खातं उघडलं नव्हतं. पहिल्या षटकात भारताला एकही धाव काढता आली नाही. सॅम करनने के एल राहुलला बाद केलं. जोस बटलरने त्याचा यष्टीमागे झेल टिपला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि इशान किशन यांनी डाव सावरला. सहा षटकांत त्यांनी ५० धावांची भागीदारी केली. इशान किशनने स्फोटक फलंदाजी करत २८ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर भारतीय संघाची १० षटकात ९४ धावासंख्या असताना इशान किशन ३१ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला. आदिल रशीदने त्याला एलबीडब्ल्यू बाद केलं. यानंतर धावसंख्या १३० असताना १३व्या षटकात रिषभ पंत १३ चेंडूत २६ धावा काढून झेलबाद झाला. ख्रिस जॉर्डनने टाकलेल्या षटकात जॉनी बेअरस्टोने त्याचा झेल टिपला व भारताचा तिसरा गडी बाद झाला. यानंतर विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी नाबाद ४९ चेंडूत ७३ धावांची खेळी करत भारताला विजयी केलं. श्रेयस अय्यर व विराट कोहली नाबाद राहिले. भारताने १७ षटकं व पाच चेंडूत १६६ धावा केल्या.