INDIA vs ENGLAND: कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
![INDIA vs ENGLAND Test squad announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/engalnd-team.jpg)
मुंबई – ऑस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजयानंतर आता चेन्नईच्या चेपक मैदानावर कसोटी क्रिकेटचा थरार दिसणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंडमधील ४ कसोटी सामन्यांची मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यातील पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार विराट कोहली पुन्हा एकदा भारतीय संघाची कमान सांभाळणार आहे. तर अजिंक्य रहाणेवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर आता पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट मंडळाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. आघाडीचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचे इंग्लंडच्या संघात पुनरागमन झाले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन लढतींसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने गुरुवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली.
दरम्यान, इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून या दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांतून स्टोक्स आणि आर्चरला विश्रांती देण्यात आली होती. भारताविरोधात चेन्नई येथे होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय कोरोनातून सावरलेला अष्टपैलू मौईन अली याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय श्रीलंका दौऱ्याचा भाग असलेली अनुभवी वेगवान गोलंदाजांची जोडगोळी जेम्स एंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड संघात कायम आहेत.
असा आहे इंग्लंडचा संघ
जो रुट (कर्णधार), रॉरी बर्न्स, डॉम सिब्ले, झॅक क्रॉवली, डॅन लॉरेन्स, ऑलिव्हर स्टोन, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, बेन फोक्स, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, डॉम बेस आणि जॅक लीच