Ind vs SA 3rd Test Ranchi : पहिल्या सत्रावर आफ्रिकेचं वर्चस्व
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Ind-Vs-SA-1.jpg)
कगिसो रबाडाने केलेल्या भेदक माऱ्यामुळे रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत आक्रमक खेळी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली.
सलामीवीर मयांक अग्रवाल कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर डीन एल्गरकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला पुजाराही भोपळा न फोडता माघारी परतला. कगिसो रबाडानेच पुजाराला बाद केलं. विराट कोहली आणि रोहित शर्माने भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र नॉर्ट्जेच्या गोलंदाजीवर कर्णधार विराट कोहलीला पंचांनी पायचीत म्हणून घोषित केलं. यामुळे भारताची अवस्था ३ बाद ३९ अशी झाली होती.
यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने भारतीय डावाला आकार दिला. आफ्रिकन गोलंदाजांचा संयमाने सामना करत रोहित-अजिंक्यने भारतीय संघाला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. या दरम्यान रोहितने आपल्या ठेवणीतले काही खास फटकेही खेळले. त्यामुळे उरलेल्या दोन सत्रांमध्ये भारतीय फलंदाज कसा खेळ करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.