गांगुली विराटला पाठवणार होता कारणे दाखवा नोटीस, पण जय शाह यांनी रोखलं; पण नेमकं घडलं काय?
![Ganguly was about to send a show cause notice to Virat, but Jai Shah stopped him; But what exactly happened?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Virat-Kohli-Sourav-Ganguly.jpg)
भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासंबंधी विराट कोहलीने डिसेंबरमध्ये पत्रकार परिषद घेत काही खुलासे केल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. गांगुलीच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयने विराट कोहलीला टी-२० संघाचं कर्णधारपद न सोडण्यासाठी विनंती केली होती. मात्र विराटने दक्षिण अफ्रिका दौऱ्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा फेटाळून लावला होता. आपल्याशी यासंदर्भात कोणीच संपर्क साधला नसल्याचं त्याने सांगितलं होतं. तसंच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासंबंधीही त्याने खुलासा केला होता. दरम्यान इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, यानंतर सौरव गांगुली विराट कोहलीला कारणे दाखवा नोटीस पाठवणार होता.
विराटचे ‘टीकास्वयंवर’; ‘टी-२० नेतृत्वत्यागाबाबत विचारणाच नाही’; सौरव आणि बीसीसीआय यांच्यातील विसंवाद उघड
दरम्यान सौरव गांगुली विराट कोहलीला कारणे दाखवा नोटीस बजावत आपलं वक्तव्य खोडून काढल्याप्रकरणी स्पष्टीकरण मागणार होता. मात्र यावेळी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मध्यस्थी केली आणि गांगुलीला नोटीस पाठवण्यापासून रोखलं.
कसोटी नेतृत्व सोडण्याची हीच योग्य वेळ कोहली
मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीने केलेल्या गौप्यस्फोटानंतर दक्षिण अफ्रिकेविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेवर कोणताही नकारार्थी परिणाम होऊ नये अशी बोर्डाची इच्छा होती. त्यामुळेच जय शाह यांनी गांगुलीकडे नोटीस न पाठवण्याची शिफारस केली.
कोहलीच्या म्हणण्यानुसार, टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर आपल्याला कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी कायम राहण्याची इच्छा होता. मात्र बोर्डाने विराटच्या जागी रोहितकडे कर्णधारपद सोपवलं. नाट्यमय घडामोडींनंतर विराट कोहलीने कसोटी संघाचं कर्णधारपदी सोडलं आहे.
विराटचा दावा काय?-
“‘टी-२० संघाचं कर्णधारपद सोडू नये यासाठी माझ्यासोबत कोणताही संपर्क साधण्यात आला नाही. आफ्रिका दौऱ्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारताच्या कसोटी संघाची निवड करण्यात आली. या निवडीसाठी ९० मिनिटे शिल्लक असतानाच मला कर्णधारपदावरून वगळण्यात आल्याचे समजले. ‘बीसीसीआय’ने एकदाही याबाबत माझ्याशी संवाद साधला नाही. कसोटी संघाबाबत संवाद झाल्यावर बैठक संपण्यासाठी पाच मिनिटे शिल्लक असताना निवड समितीच्या अध्यक्षांनी मला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे, असे सांगितले. त्यावेळी त्यांचा निर्णय मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता,” असं विराटने सांगितलं.
कोहलीने संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या विश्वचषकानंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडलं. त्याच्या काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडून भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वपदही काढून मुंबईकर रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या मुद्द्यावर, ‘विराटला टी-२० कर्णधारपद सोडण्याविषयी फेरविचार करण्याची विनंती केली. पण त्याने प्रतिसाद न दिल्यामुळे आणि मर्यादित षटकांसाठी दोन कर्णधार नकोत म्हणून रोहितला कर्णधार केलं’ असे विधान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केलं होतं. त्याच्याशी पूर्ण विसंगत विराटचं विधान ठरलं.