चेन्नई सुपर किंग्सला डबल दणका! BCCI ची कॅप्टन ऋतुराजसह संपूर्ण संघावर मोठी कारवाई

अहमदाबाद | चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाच्या आयपीएल २०२६ हंगामाचा शेवट अत्यंत निराशाजनक राहिला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात ८९ धावांनी लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. धावांच्या तुलनेत हा चेन्नईच्या आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला आहे. या पराभवाच्या धक्क्यातून संघ सावरत नाही तोच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कर्णधार ऋतुराज गायकवाडसह संपूर्ण संघावर दंडात्मक कारवाई करत मोठा झटका दिला आहे.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात निर्धारित वेळेत षटकं पूर्ण न केल्यामुळे (Slow Over Rate) बीसीसीआयने चेन्नई सुपर किंग्सला दोषी ठरवले आहे. आयपीएल आचारसंहितेच्या नियम २.२२ नुसार हा गुन्हा या हंगामात चेन्नईने दुसऱ्यांदा केला आहे. त्यामुळे कर्णधारासह संपूर्ण संघाला मोठा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. यानुसार कर्णधार ऋतुराज गायकवाडला २४ लाख रुपयांचा दंड झाला आहे, तर प्लेइंग इलेव्हन मधील इतर सर्व खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख रुपये किंवा त्यांच्या सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा
अभिनेत्री त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणाचा तपास आता CBI कडे; मध्यप्रदेश सरकारची मोठी घोषणा
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स या हंगामात पूर्णपणे अपयशी ठरली. या हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांपैकी संघाला केवळ ६ सामन्यांत विजय मिळवता आला, तर ८ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. १२ गुण आणि उणे ०.३४५ च्या खराब नेट रन रेटमुळे सीएसकेला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या हंगामात चेन्नईला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयश आले आहे. चेन्नईने आपले शेवटचे आयपीएल विजेतेपद २०२३ मध्ये एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले होते.
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून गुजरात को प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. गुजरातच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली, तर दुसऱ्या विकेटसाठी साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी ८२ धावा जोडल्या. टॉप-३ फलंदाजांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने २२९ धावांचा डोंगर उभारला. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव पत्त्यासारखा कोसळला आणि संपूर्ण संघ १३.४ षटकांत अवघ्या १४० धावांवर सर्वबाद झाला. यंदाच्या संपूर्ण हंगामात चेन्नईला त्यांच्या अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार एम. एस. धोनीची सर्वाधिक उणीव भासली; दुखापतीमुळे तो या हंगामात एकही सामना खेळू शकला नव्हता.





