भारत वर्ल्डकपमधून बाहेर..भारतावर ऑस्ट्रेलियाच्या थरारक विजय
![Australia's entry into the T20 World Cup finals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/IND-vs-AUS-2-780x470.jpg)
ऑस्ट्रेलिया संघाचा टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश
IND vs AUS : भारतविरूद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान महिला टी-२० विश्वचषकाचा सेमीफायनल सामना खेळाला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा ५ धावांनी पराभव करत महिला टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी दमदार सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मूनीने ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार मेघ लेनिंगने नाबाद ४९ धावांची दमदार खेळी केली. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने २० षटकात ४ बाद १७२ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी १७३ धावांचे आव्हान ठेवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. सुरूवातीलाच भारताचे तीन गडी स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी भारताचा डाव सावरला. हरमनप्रीतने ३४ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. भारताची धावसंख्या १३३ असताना हरमनप्रीत धावबाद झाली. भारताला हा ५ धक्का होता.
भारताला अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती. यावेळी राधा यादव फलंदाजी करत होती. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ती शून्यावर बाद झाली. अखेर भारतीय संघाचा ५ धावांनी पराभव झाला.
महिला टी-२० विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर भावुक झाली आहे. माझ्या देशाने मला रडताना पाहावे असे मला वाटत नाही, म्हणूनच मी हा चष्मा घालून आले आहे, मी वचन देते की आम्ही आमचा खेळ सुधारू आणि देशाला पुन्हा असे निराश होऊ देणार नाही, असे कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली.