क्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

पायाने तिरंदाजी करणाऱ्या शितल देवीला पराभवाचा धक्का

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत आत्तापर्यंत भारतीय खेळाडूंची चांगली कामगिरी

नवी दिल्ली : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत आत्तापर्यंत भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली राहिली आहे. भारताकडून नेमबाजांनी तर चमकदार कामगिरी केली. शनिवारी भारताला १७ वर्षीय तिरंदाज शितल देवी हिच्याकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या. ती पॅरालिम्पिकमध्ये महिला वैयक्तिक कंपाऊंड ओपन प्रकारात सहभागी झाली होती.

दोन्ही हात नसल्याने पायाने तिरंदाजी करणाऱ्या खूप कमी तिरंदाजांपैकी एक असलेल्या शितलने आत्तापर्यंत अनेकदा अफलातून कामगिरी करत विजेतीपदं मिळवली आहेत. ती पॅरा तिरंदाजीमधील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, शनिवारी तिला अगदी रोमांचक झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. शितलचा उपउपांत्यपूर्व फेरीतील सामना चिलीच्या झुनिगा मारियाना हिच्याविरुद्ध झाला. झुनिगा टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती आहे. या सामन्यात झुनिगाने शितलला १३८-१३७ गुणांच्या फरकाने पराभूत केले. अगदी एका गुणाचा फरक राहिला. त्यामुळे शितलचे या प्रकारातील आव्हान संपुष्टात आले.

याशिवाय याच प्रकारात भारताची सरिता ही देखील सहभागी झाली होती. परंतु, तिलाही उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. तिला ओझनुर क्युर गिर्दी हिने १४५-१४० गुणांच्या फरकाने पराभूत केले. तिने उपउपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला होता. पण त्यानंतर तिचेही आव्हान संपले. दरम्यान, शनिवारी भारताला एकच पदक मिळालं, जे रुबिना फ्रान्सिस हिने मिळवून दिले. तिने P2 महिला १० मीटर एअर पिस्तुल SH1 प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले. हे भारताचे एकूण पाचवे, तर नेमबाजीतील तिसरे पदक ठरले. यापूर्वी नेमबाजीतून अवनी लेखराने सुवर्णपदक, मोना अगरवलने कांस्य पदक आणि मनिष नरवालने रौप्य पदक जिंकले आहे. तसेच ऍथलेटिक्समध्ये महिला T35 १०० मीटर शर्यतीत प्रीती पालने कांस्य पदक पटकावले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button