स्मोलोव्ह, झियुबा यांचे रशियन संघात कम बॅक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/New-Logo-for-2018-FIFA-World-Cup-Russia-1-1.jpg)
- फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा
मॉस्को – प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त झालेल्या यजमान रशियाने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आपला 23 खेळाडूंचा संघ जाहीर करून वादांना पूर्णविराम दिला आहे. या संघात फयोडोर स्मोलोव्ह आणि आर्टेम झियुबा या अव्वल आक्रमक खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून सर्वोत्तम संघ देण्याचा प्रयत्न रशियाने केला आहे.
बचावपटू जॉर्जी झिकिया, बचावपटू व्हिक्टर व्हेसिन आणि आघाडीवीर अलेक्झांडर व्हिक्टर कोकोरिन यांना दुखापती झाल्या असून गोलरक्षक अलेक्झांडर सेलिखोव्हच्या पोटरीचा स्नायू दुखावला असल्याने रशियाला जबर धक्का बसला आहे. अर्थात अव्वल मध्यरक्षक डेनिस चेरिसेव्हच्या पुनरागमनामुळे रशियाला दिलासा मिलाला असला, तरी तो खेळूनही रशियाला ऑस्ट्रियाविरुद्ध सराव सामन्यात 0-1 असा पराभव पत्करावा लागला.
रशियाचा एक सराव सामना बाकी असून उद्या (मंगळवार) होणाऱ्या या लढतीत त्यांना तुर्कीशी झुंज द्यावी लागेल. फिफा विश्वचषक स्पर्धेत रशियाची सलामीची लढत 14 जून रोजी सौदी अरेबियाविरुद्ध रंगणार आहे. रशियासमोर 19 जून रोजी इजिप्तचे, तर 25 जून रोजी उरुग्वेचे आव्हान आहे.
रशियाचा फुटबॉल संघ –
गोलरक्षक- इगोर अकिनफीव्ह, व्लादिमीर गॅबुलोव्ह व आन्द्रे लुनेव्ह, बचावपटू- व्लादिमीर ग्रॅनेट, फयोडोर कुद्रियाशोव्ह, इल्या कुटेपोव्ह, आन्द्रे सेम्योनोव्ह, इगोर स्मोल्निकोव्ह, मारिओ फर्नांडिस व सर्गेई इग्नाशेव्हिच, मध्यरक्षक- युरी गॅझिन्स्की, ऍलन झागोएव्ह, अलेक्झांडर गोलोविन, अलेक्झांडर एरोखिन, युरी झिर्कोव्ह, दलेर कुझियाएव्ह, रोमन झॉबनिन, अलेक्झांडर सॅमेदोव्ह, ऍन्टन मिरान्चुक व डेनिस चेरिशेव्ह, आघाडीवीर- आर्टेम झियुबा, अलेक्सी मिरान्चुक व फयोडोर स्मोलोव्ह.