स्पॅनिश कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटला सुवर्णपदक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/VINESH-PHOGAT2.jpg)
नवी दिल्ली: भारताची महिला कुस्तीगीर विनेश फोगटने माद्रिद येथे पार पडलेल्या स्पॅनिश ग्रां प्री कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करताना आगामी आशियाई क्रीडास्पर्धेसाठी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा दिला. विनेशने या स्पर्धेतील पाच लढतींमध्ये केवळ एक गुण गमावला.
केवळ 23 वर्षीय विनेशने महिलांच्या 50 किलो वजनगटाच्या अंतिम लढतीत कॅनडाच्या नताशा फॉक्सचा 10-0 असा धुव्वा उडवीत सुवर्णपदकाची निश्चिती केली. विनेशचे हे सलग दुसरे सुवर्णपदक ठरले. तिने याआधी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही सोनेरी यश मिळविले होते. विनेशने त्याआधी पहिल्या फेरीत मरियाना दियाझवर तांत्रिक गुमांच्या आधारे विजय मिळविताना विजयी सलामी दिली होती.
त्यानंतर दुसऱ्या फेरीत विनेशने एरिन गोलस्टोनला 12-1 असे पराभूत केले. उपान्त्यपूर्व लढतीत विनेशने व्हॅलेरिया चेपसाराकोव्हावर 5-0 अशी एकतर्फी मात केली. तर उपरान्त्य सामन्यात जेस्सी मॅकडोनाल्डचा 10-0 असा फडशा पाडताना विनेशने थाटात अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीतही आपले वर्चस्व कायम राखताना विनेशने नताशा फॉक्सवर दणदणीत मात केली. आशियाई क्रीडास्पर्धेपूर्वी सरावासाठी विनेशला ही अखेरची संधी होती. सध्या वूलर ऍकॉस या हंगेरियन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या विनेशने ऍकॉस यांना आपले वैयक्तिक प्रशिक्षक म्हणून भारतात येऊ देण्याची मागणी केली आहे.