सॅफ चषक फुटबॉल स्पर्धा : भारतीय युवा संघ अंतिम फेरीत
काठमांडू : भारताच्या युवा फुटबॉल संघाने मालदीवचा ४-० असा धुव्वा उडवत सॅफ चषक (१८ वर्षांखालील) फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नरेंद्र गेहलोत (सातव्या मिनिटाला), मानवीर सिंग (७९व्या मिनिटाला) आणि निंठोइंगानबा मीतेई (८१व्या मिनिटाला) यांनी गोल करत भारताच्या विजयात योगदान दिले. मालदीवच्या अहनाफ रशीध (४५व्या मिनिटाला) याने स्वयंगोल करत भारताच्या खात्यात एका गोलाची भर घातली. आता रविवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत भारताची गाठ बांगलादेशशी पडणार आहे.
भारताने आक्रमक सुरुवात करत प्रतिस्पध्र्याच्या बचावपटूंवर दडपण आणले. याचा फायदा उठवत मधल्या फळीत खेळणाऱ्या नरेंद्रने भारताचे खाते खोलले. त्यानंतर भारताने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. गिव्हसन याला गोल करण्याची अप्रतिम संधी होती. मात्र डाव्या कॉर्नरवरून मिळालेल्या क्रॉसवर त्याने हेडरद्वारे मारलेला फटका गोलजाळ्याच्या वरून गेला. मालदीवचा गोलरक्षक हसन अलीफ याने चेंडूला वर ढकलले. मध्यंतराचा खेळ संपण्यास काही सेकंद शिल्लक असताना अहनाफ याच्या स्वयंगोलमुळे भारताला २-० अशी आघाडी घेता आली.