वॉशिंग्टन ओपन टेनिस स्पर्धा: संघर्षपूर्ण विजयासह अँडी मरेची आगेकूच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Andy-Murray-69-1.jpg)
वॉशिंग्टन: तीन ग्रॅंड स्लॅम विजेता ब्रिटिश टेनिसपटू अँडी मरेने सलग दुसऱ्या फेरीत संघर्षपूर्ण विजयाची नोंद करताना वॉशिंग्टन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मरेने रुमानियाच्या मेरियस कॉपिनचा प्रखर प्रतिकार 6-7, 6-3, 7-6 असा मोडून काढताना आगेकूच कायम राखली. विश्वक्रमवारीत एकेकाळी अग्रस्थानावर असलेल्या मरेची सध्या 832व्या क्रमांकावर घसरगुंडी झाली आहे.
प्रचंड दडपणाखाली मिळविलेल्या या विजयानंतर मरेला अश्रू आवरता आले नाहीत. त्याने मैदानावरच टॉवेलमध्ये तोंड लपवून आपल्या भावनांना वाट करून दिली. दुखापतीमुळे सुमारे 11 महिने टेनिसपासून दूर राहिलेल्या मरेची पुनरागमनानंतर ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
मरेने याआधीच्या फेरीत चतुर्थ मानांकित कायली एडमंडवर संघर्षपूर्ण विजय मिळविताना आत्मविश्वासाची कमाई केली होती. मरेसमोर आता ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स डी मिनॉरचे आव्हान आहे.
दरम्यान, विम्बल्डनच्या उपान्त्य फेरीतील प्रदीर्घ काल रंगलेल्या विक्रमी सामन्यानंतर अटलांटा स्पर्धेतही एकामागून एक प्रदीर्घ सामने खेळावे लागलेल्या जॉन इस्नरला अमेरिकेच्या नोआह रुबिनकडून 4-6, 6-7 असा पराभव पत्करावा लागला. द्वितीय मानांकित इस्नरने रुबिनला फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत सहज पराभूत केले होते. परंतु आजच्या सामन्यात रुबिनने बाजी मारली. व्यस्त आणि थकविणारे वेळापत्रक हेच आपल्या पराभवाचे कारण असल्याचे इस्नरने सांगितले.
रुबिनसमोर पुढच्या फेरीत 16व्या मानांकित आन्द्रे रुब्लोव्हचे आव्हान आहे. महिला गटांत अमेरिकन ओपन विजेती स्लोन स्टीफन्स आणि ऑस्ट्रेलियन ओपन विजेती कॅरोलिन वोझ्नियाकी यांचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे तृतीय मानांकित नाओमी ओसाका हीच सर्वोच्च मानांकित खेळाडू राहिली आहे.