रोईंगमध्ये सुवर्णपदक पटकाविणाऱ्या खेळाडूंची आज शोभायात्रा
- क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान सोहळ्याचे आयोजन
पुणे- महाराष्ट्र रोईंग असोसिएशन,महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचलनालय आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या संयुक्त विद्यमाने जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केलेल्या खेळाडूंची ढोल -ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच यावेळी क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहून खेळाडूंचे अभिनंदन करणार आहेत. शनिवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बोट क्लब येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
बोट क्लब कॉलेज ऑफ इंजिनिअरींग हॉस्टेलपासून डेक्कन पर्यंत रॅली निघणार आहे. सीओईपी हॉस्टेल, बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन महाविद्यालय, ज्ञानेश्वर पादुका चौक, आणि शिवाजीनगर असा शोभायात्रेचा मार्ग असणार आहे. पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा निघणार आहे. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे बाळासाहेब लांडगे, चंद्रकांत शिरोळे, महाराष्ट्र रोईंग असोसिएशनचे अध्यक्ष मुज्तबा लोखंडवाला, सचिव मृदुला कुलकर्णी, खजिनदार क्रिष्णांद हेबळेकर, नरेंद्र कोठारी, संजय वळवी, स्मिता यादव यावेळी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत पदकप्राप्त केलेल्या खेळाडू पुण्यातील असून त्यांनी पुण्यातच प्रशिक्षण घेतले आहे.