भारतीय फुटबॉल क्लबमध्ये मँचेस्टर सिटीची गुंतवणुकीची योजना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Untitled-7-8.jpg)
मुख्य कार्यकारी अधिकारी फेरान सोरिआनो यांची माहिती
इंग्लिश प्रीमिअर लीगमधील बलाढय़ समजला जाणारा मँचेस्टर सिटी हा क्लब आता भारतातील फुटबॉल क्लबमध्येही गुंतवणूक करणार आहे. या वर्षांच्या अखेरीस भारतातील फुटबॉल क्लबमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असल्याचे मँचेस्टर सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फेरान सोरिआनो यांनी सांगितले.
‘‘इंग्लिश प्रीमिअर लीगमधील विजेत्या मँचेस्टर सिटीने इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) मुंबई सिटी एफशी या संघाशी बोलणी सुरू केली आहेत. त्याचबरोबर जमशेदपूर एफशी या संघाशीही प्राथमिक स्तरावर वाटाघाटी सुरू आहेत. गेल्या वर्षी जमशेदपूर आणि मुंबई सिटी यांच्यातील सामना पाहण्यासाठी आम्ही भारतात आलो होतो. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेली मुंबई सिटीबरोबरची बोलणी एका वेगळ्या टप्प्यावर गेली आहेत,’’ असे मँचेस्टर सिटीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
मँचेस्टर सिटीचे मालक अबूधाबीचे शेख मन्सूर यांनी अलीकडेच चीनमधील सिचूआन जिनियू हा क्लब खरेदी केला आहे. त्यांच्याकडे न्यू यॉर्क सिटी, मेलबर्न सिटी, जपानमधील योकोहामा एफ मरिनोस, अॅटलेटिको टॉक्र्यू तसेच गिरोना या संघांची मालकी आहे. ‘‘ज्या देशात फुटबॉल हा खेळ लोकप्रिय आहे आणि ज्या देशांत व्यापारासाठी संधी आहे, अशा चीन आणि भारतासारख्या देशांत गुंतवणूूक करण्याची आमची योजना आहे. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत आमची पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करत आहोत,’’ असे सोरिआनो यांनी सांगितले.
‘‘या सर्व वाटाघाटींनंतरही आम्ही संयमी पवित्रा अंगिकारला आहे. या वर्षांच्या अखेरीस आम्ही भारतातील क्लबमध्ये गुंतवणूक केली असेल. येत्या १० वर्षांत मँचेस्टर सिटीच्या ताफ्यात आणखीन दोन ते तीन क्लब असतील. गेल्या पाच वर्षांत आम्ही बरेचसे संघ विकत घेतले,’’ असेही त्यांनी सांगितले.