Breaking-newsक्रिडा
बजरंगसाठी मी निवृत्ती पत्करेन -योगेश्वर दत्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Yogeshwar-Dutt.jpg)
आपला आवडता शिष्य बजरंग पुनिया याला २०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्यासाठी सज्ज करण्याकरिता वेळप्रसंगी मला निवृत्ती पत्करावी लागली तरी मोठय़ा आनंदाने मी निवृत्त होण्यास तयार आहे, असे लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या योगेश्वर दत्तने सांगितले.
खाशाबा जाधव आणि ससील कुमार यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारा योगेश्वर हा भारताचा तिसरा कुस्तीपटू ठरला आहे. आपल्या यशस्वी कारकीर्दीत योगेश्वरने २०१४च्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तो म्हणाला की, ‘‘बजरंगला २०२० ऑलिम्पिकसाठी तयार करण्यावर मी लक्ष केंद्रित केले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावण्यासाठी बजरंगला पाठिंबा देणे सर्वात महत्त्वाचे आहे. तो चांगला कुस्तीपटू असून अजून चांगली कामगिरी करू शकतो. जर मी २०२० ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकणार नसेल तर बजरंगला मदत करीन. टोकियो ऑलिम्पिकसाठी तो सुवर्णपदकाच्या शर्यतीतील अव्वल खेळाडू मानला जात आहे. माझ्या कारकीर्दीत मी चार वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालो. भारताच्या दुसऱ्या फळीतील अव्वल कुस्तीगीर असलेल्या बजरंगला अधिकाधिक संधी आणि पाठिंबा देणे आवश्यक आहे. ’’