Breaking-newsक्रिडा
बंगालचे माजी कर्णधार गोपाळ बोस यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Gopal-Bose-696x392.jpg)
नवी दिल्ली: बंगालचे माजी कर्णधार व सलामीवीर गोपाळ बोस यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. बर्मिंगहॅममधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 71 वर्षांचे होते. पत्नी व पुत्र अर्जित त्यांच्या मागे आहेत.
गोपाळ बोस यांनी सुमारे दशकभरापेक्षा अधिक काळ बंगालचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी बंगालकडून 78 प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये 3757 धावा काढल्या. त्यात 8 शतके व 17 अर्धशतकांचा समावेश होता. प्रदीर्घ काळ संयमी खेळी करण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. तसेच बोस यांनी आपल्या ऑफस्पिन गोलंदाजीवर 72 बळीही घेतले.
बोस यांनी श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली होती. या दौऱ्यातील प्रथमश्रेणी सामन्यात बोस यांनी लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्यासह 194 धावांची शानदार सलामी भागीदारी केली होती. त्यात बोस यांचा वाटा 104 धावांचा होता. त्यानंतर बोस यांची 1974 मधील इंग्लंड दौऱ्यासाठीही भारतीय संघात निवड झाली होती. त्या दौऱ्यात ते भारताच्या संघातून एक एकदिवसीय सामना खेळले. ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात त्यांनी 13 धावा केल्या व डेव्हिड लॉईडचा बळी घेतला.
भारताकडून त्यांचा हा एकमेव सामना होता. निवृत्तीनंतर बोस यांनी बंगालचे निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2008 मद्ये 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारताच्या युवक संघाचे ते व्यवस्थापकही होते.