फुटबॉल विश्वचषकाला अपघाताचे गालबोट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/accident21qwa_2.jpg)
मॉस्को : फुटबॉल विश्वचषकामुळे रशिया सध्या फुटबॉलमय झाले आहे. विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी रशियात दाखल झालेले आहेत. दरम्यान, शनिवारी मॉस्कोमध्ये झालेल्या अपघातात एका मद्यपी कारचालकाने बेदरकारपणे कार चालवत फुटबॉलप्रेमींना उडवले. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मेक्सिकोच्या एका नागरिकाचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टॅक्सी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडे किर्गिस्तानचा वाहन चालवण्याचा परवाना आहे. दरम्यान, आपण जाणून बुजून अपघात घडवला नसल्याचा दावा या कारचालकाने केला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना किरकोळ दुखापती झाल्या असून, कुणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.
जर्मनी आणि मेक्सिको यांच्यातील लढत रविवारी मॉस्कोमध्ये होणार आहे. त्यामुळे ही लढत पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमी मॉस्कोमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. काही फुटबॉल प्रेमी मेक्सिकोच्या संघाच्या रंगाप्रमाणे असलेले कपडे घातून जात होते. त्याचदरम्यान एका कारने त्यांना धडक दिली. अपघातानंतर कार चालकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.