न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Mike-Hesson.jpg)
न्यूझीलंडच्या संघाचे माजी प्रशिक्षक माईक हेसन भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती समोर येते आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. ३० जुलैपर्यंत नवीन उमेदवारांना आपले अर्ज पाठवण्याची मूभा देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हेसन भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी उत्सुक असल्याचं कळतंय. हेसन न्यूझीलंडच्या संघाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक मानले जातात, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडने २०१५ विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने नवीन अटी आखून दिल्या आहेत. या अटींमध्ये हेसन योग्य ठरतात की नाही याची चाचपणी सध्या सुरु आहे. मात्र हेसन यांनी स्वतः प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यात रस दाखवला आहे. लवकरच ते यासाठी अधिकृतरित्या अर्ज करतील, सुत्रांनी माहिती दिली.
आयपीएलमध्ये हेसन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे भारतीय संघातील लोकेश राहुल, मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन यासारख्या खेळाडूंसोबत काम करण्याचा हेसन यांच्याकडे अनुभव आहे. त्यातचं नवीन अटींनुसार आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभव हेसन यांच्याकडे आहे. त्यामुळे हेसन यांचा अर्ज आल्यास ते या पदासाठी प्रबळ दावेदार ठरु शकतात.