breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रद्द होणार?

मुंबई – भारतात करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने आता बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांबाबत कोणताही ठाम निर्णय घेतलेला नाही. रणजी करंडकापासून अन्य सर्व देशांतर्गत स्पर्धा यंदा रद्दच होणार असल्याचे संकेतही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहेत.

यंदाच्या मोसमात परंपरेनुसार होत असलेल्या अनेक स्पर्धा होणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मात्र, भारतीय संघाच्या निवडीचा निकष असलेली रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा घेण्याबाबत गांगुलीने आशावाद व्यक्‍त केला होता.

मात्र, करोनाचा धोका अद्याप कायम असून देशाच्या काही राज्यांतच त्याचा कहर सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी बीसीसीआय या स्पर्धांबाबत कोणताही निर्णय घेण्याच्या तयारीत नाही. देशांतर्गत स्पर्धांच्या आयोजनासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असल्याचे वक्‍तव्य गांगुलीने केले होते. मात्र, अद्याप यातील एकाही स्पर्धेबाबत बीसीसीआयने जाहीर भूमिका घेतलेली नसल्याने यंदाच्या वर्षात या स्पर्धा रद्द करण्यात येणार हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे.

जर एक किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने काही राज्यांमध्ये करोनाचा धोका कमी झाला तर यंदाच्या वर्षाअखेरीस किमान रणजी करंडक स्पर्धा घेण्याबाबत सध्या विचार सुरू आहे. मात्र, देवधर, दुलीप, हजारे व सय्यद मुश्‍ताक अली टी-20 तसेच विविध वयोगटांच्या स्पर्धांना मात्र यंदा कात्री लावली जाणार आहे. आयपीएल

स्पर्धेसाठी अमिरातीत सर्व खेळाडूंसाठी बायो-बबल सुरक्षा तयार करण्यात आली आहे, त्यामुळे देशांतर्गत स्पर्धांसाठीही अशी सुरक्षा का करण्यात येत नाही अशी विचारणा विविध राज्य संघटनांनी केली होती. मात्र, इतक्‍या मोठ्या प्रमाणावर ही व्यवस्था करणे कठीण असल्याचेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदा देशांतर्गत स्पर्धा होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button