Breaking-newsक्रिडा
केवळ विराट हाच सचिनच्या जवळपास – सकलेन मुश्ताक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/saqlian-mustaq-e1535386124794.jpg)
साऊदम्प्टन: सचिन तेंडुलकर हा फारच मोठा खेळाडू होता. शिवाय त्याच्या वेळचा आणि सध्याच्या काळाची तुलना मी करू शकणार नाही. परंतु सध्याच्या काळात कोणता खेळाडू सचिनच्या जवळपास जाणारा असेल, तर तो केवळ विराट कोहली हाच होय, असे पाकिस्तानचा महान फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताकने म्हटले आहे. सकलेन सध्या सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचे “फिरकी सल्लागार’ आहेत.
मुश्ताक म्हणाले की, फलंदाज म्हणून सचिन सार्वकालिक महान खेळाडू आहे. मी त्याच्याशी कोणाचीही तुलना करू शकत नाही. मात्र सध्या क्रिकेट खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिनच्या जवळपास जाणारी प्रतिभा केवळ विराट कोहलीमध्ये दिसून येते आहे. विराट सचिनसारखाच जबरदस्त आत्मविश्वासाने फलंदाजी करताना सध्याच्या कसोटी मालिकेत दिसून येतो आहे. विराटमध्ये धावांची प्रचंड भूक आहे, त्यामुळे त्याच्या खेळीत सचिनचा भास होतो, असेही सकलेन मुश्ताक यांनी यावेळी सांगितले.
मुश्ताक म्हणाले की, कसोटी मालिकेत विराट आपली प्रतिभा दाखवून देत आहे, पहिला सामना भारताने थोडक्यात गमावला. मात्र विराटने दोन्ही डावात चांगली कामगिरी करताना सामन्यांत 200 धावा केल्या. तिसऱ्या कसोटीत भारताने आपली पिछाडी 1-2 अशी भरून काढताना मालिकेत पुनरागमन केले. मला वाटते की याचे श्रेय विराटलाच जाते. कारण विराट इतर फलंदाज बाद होत असतानाही पुढे येऊन लढतो. त्यामुळे इतर खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
तिसऱ्या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी विराटला लक्ष्य करत आक्रमक गोलंदाजी केली. मात्र विराटने त्याचे प्रत्युत्तर तितक्याच आक्रमकपणे दिले, असे सांगून सकलेन म्हणाले की, या सामन्यात जेम्स अँडरसनचा चेंडू जवळपास 40 वेळा विराटच्या बॅटची कड घेताना अगदी थोडक्यात चुकला. मात्र पुढच्याच चेंडूवर तो पुन्हा तितक्याच आत्मविश्वासाने खेळताना दिसला. विराटच्या फलंदाजीचा सकारात्मक परिणाम बाकी भारतीय खेळाडूंवरही होताना दिसतो आहे. या मालिकेतील उरलेल्या दोन्ही सामन्यांचे निकाल हे विराट भारतीय संघाचे कशाप्रकारे नेतृत्व करतो यावरच अवलंबून आहे.
अश्विन जागतिक दर्जाचा गोलंदाज
अश्विनला मी चार-पाच वर्षांपूर्वी पाहिले तेव्हा तो एक चांगला फिरकी गोलंदाज होता. परंतु भारताबाहेर विविध ठिकाणी खेळून, अपयशी ठरून, यश मिळवून मगच तो खऱ्या अर्थाने तयार होणे आवश्यक होते. आज तो तसा तयार झालेला दिसतो आहे. या मालिकेत अश्विन ज्या प्रकारे गोलंदाजी करीत आहे, त्याच्या चेंडूची दिशा, टप्पा व वेगातील वैविध्य आणि वेगवेगळ्या फलंदाजांना चकविण्यासाठी तो वापरीत असलेले कल्पक डावपेच हे सारे त्याच्या माऱ्यात दिसते आहे. अश्विन ज्या प्रकारे डावखुऱ्या फलंदाजांना पेचात पकडतो, ते पाहण्यासारखे असते. फिरकी गोलंदाजी हेच जीवन, असे मानणाऱ्या माझ्यासारख्याला अश्विनची गोलंदाजी पाहणे हा अपूर्व आनंद आहे. अश्विन आणखी परिपक्व होत जाईल, तसतसा तो आणखी चांगला गोलंदाज बनेल अशी माझी खात्री आहे.