‘आशियाई’ हुकल्याची खंत, पण आता लक्ष्य ऑलिम्पिकचे!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/spt05-2.jpg)
महाराष्ट्राचा कुस्तीपटू उत्कर्ष काळेचा निर्धार
ऋषिकेश बामणे, विजयनगर (कर्नाटक)
बारामतीच्या काठेवाडी परिसरात राहणाऱ्या कुस्तीपटू उत्कर्ष काळेची यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी हुकली असली तरी आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्धार त्याने प्रकट केला आहे.
२०१५ मध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या लढतीत कनिष्ठ गटातील उत्कर्षने ऑलिम्पिकपटू अमित कुमारसारख्या चपळ कुस्तीपटूला धूळ चारल्यामुळे तो प्रकाशझोतात आला. या विजयामुळेच त्याची बेंगळूरु येथील इन्स्पायर इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स (आयआयएस) येथे निवड झाली. या केंद्रात रमाधर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी उत्कर्षची तयारी सुरू आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यातर्फे उत्कर्षला दरवर्षी १२ लाख रुपयांची मदत मिळते. ५७ किलो वजनी गटात सहभागी होणारा उत्कर्ष नोव्हेंबरमध्ये अयोध्या येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी प्रो रेसलिंग लीगच्या बोलीबाबतही त्याला कमालीची उत्सुकता आहे.
शेतकऱ्याच्या मुलाचा संघर्षमय प्रवास
काठेवाडीत कुस्तीपटू म्हणून कारकीर्द घडवण्याचा कोणी विचार जरी केला, तरी संपूर्ण गावातील लोक त्याची खिल्ली उडवायचे. उत्कर्षचे वडील पंढरीनाथ काळे हे शेतकरी असल्यामुळे बालपणापासूनच उत्कर्षची परिस्थिती तशी हलाखीचीच होती. ओझे उचलून तसेच कष्टाची कामे करून त्याची शरीरयष्टीदेखील कणखर बनत गेली. उत्कर्षची आई वैशालीसुद्धा वडिलांच्याच कामात हातभार लावते. गावात रंगणाऱ्या कुस्तीच्या लढती तो आवर्जून पाहण्यासाठी जायचा. तेथूनच त्याला कुस्तीविषयी आवड निर्माण झाली. सुरुवातीला फक्त मनोरंजन म्हणून कुस्ती खेळण्यास सुरुवात करणाऱ्या उत्कर्षने मात्र कुस्तीपटू होण्याचेच स्वप्न उराशी बाळगले होते. वयाच्या अवघ्या १०व्या वर्षीच मनाशी पक्का निर्धार करणाऱ्या उत्कर्षच्या देहबोलीकडे पाहून त्याच्या स्वप्नांची जाणीव होते.
‘‘वडील आणि घरातील चुलत भावंडे कुस्ती खेळत असली तरी त्यांपैकी कोणासही यामध्ये कारकीर्द घडवण्याची इच्छा नव्हती. शिवाय त्या वेळी असलेल्या अपुऱ्या सोयी-सुविधांमुळेदेखील त्यांचे निर्णय बदलले व त्यांनी माझ्यावर लक्ष केंद्रित केले,’’ असे उत्कर्षने सांगितले. वडिलांनी उत्कर्षला भवानीनगर येथे कुस्तीचे धडे घेण्यासाठी पाठवण्यास सुरुवात केली. शाळेतून कुस्तीची सुरुवात करणाऱ्या उत्कर्षने पुढे जिल्हा आणि राज्यस्तरीय पातळीवरदेखील चमकदार कामगिरी केली. सातवीत असताना उत्कर्षने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली. त्यामुळे कुस्तीपटू काका पवार यांच्या पुण्यातील अकादमीत उत्कर्षला प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली. काकांच्या मार्गदर्शनाखाली उत्कर्षने २०१४ मध्ये वरिष्ठांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.
‘‘आई-वडिलांचे, चुलत्यांचे आणि काका पवारांचे योगदान आपल्या आयुष्यात फार मोलाचे आहे. त्यांच्यामुळेच मी इथवर पोहोचलो आहे,’’ असे उत्कर्षने सांगितले.