अखेर उपांत्य फेरीचं समीकरण ठरलं, टीम इंडियाची टक्कर ‘या’ संघाशी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/semi-final.jpg)
विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियावर १० धावांनी मात केल्याने गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. परिणामी, अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रलियाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली असून भारताने पहिले स्थान पटकाविले आहे. यासोबतच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाची लढत नेमकी कुणाशी होणार याचं उत्तर देखील मिळालं असून उपांत्य फेरीत टीम इंडियाची टक्कर न्यूझीलंड संघाशी होणार आहे.
काय आहे उपांत्य फेरीचं समीकरण –
यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल होता, तर भारत १३ गुणांसह दुसऱ्या स्थानी होता. पण कालच्या आपल्या अखेरच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केल्याने गुणतालिकेत भारत १५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला. पुन्हा अव्वल स्थान गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला त्यांचा आफ्रिकेविरोधातील सामना जिंकणं आवश्यक होतं, पण आफ्रिकेकडून १० धावांनी पराभव झाल्याने ते १४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर स्थिरावले. आता १२ गुणांसह इंग्लंड तिसऱ्या स्थानी आहे तर न्यूझीलंड ११ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. आता या चार संघात अंतिम फेरीसाठी लढत होणार आहे.
कधी होणार सामना-
उपांत्य फेरीचा पहिला सांमना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे. ९ जुलै रोजी हा सामना होईल. त्यानंतर , दुसरा सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलियामध्ये ११ जुलै रोजी बर्मिंगममध्ये खेळला जाईल.