breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भाजपात खांदेपालट: बावनकुळेंना भाजप प्रदेशाध्यक्षपद, तर मुंबई अध्यक्षपदी ॲड. आशिष शेलार कायम!

मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे पक्षात खांदेपालट करण्यात आले आहे. तर आशिष शेलार (Aashish Shelar) यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपने आक्रमक चेहऱ्याला बळ दिले आहे. विद्यमान भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचीही मंत्रिपदावर नियुक्ती झाल्याने शेलारांना अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे.

कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा मंत्रिपदाची धुरा होती. डिसेंबर २०१४ मध्ये नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी नागपुरातील कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००४, २००९, २०१४ असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपने २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले नाही, ते त्यांच्या पत्नी ज्योती यांना देण्यात आले, त्यांनी कामठी येथून निवडणुकीचा फॉर्म भरला, परंतु शेवटच्या क्षणी, फॉर्म भरल्यानंतर, ज्योती यांना भाजपने एबी फॉर्म नाकारला होता. त्यामुळे बावनकुळेंना पाठिंबा देणारा तेली समाज मोठ्या प्रमाणावर नाराज झाला होता.

त्यानंतर नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बावनकुळेंना स्थान देण्यात आलं. बावनकुळेंनी महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेवारांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला होता. तूर्तास विधानपरिषदेवरील नेत्यांना भाजपने मंत्रिमंडळातून लांब ठेवले आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित विस्तारात त्यांची वर्णी लागली नाही. परंतु भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ गळ्यात घालत बावनकुळेंचा सन्मान केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button