breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

‘महानगरपालिका शाळांमुळे भविष्यात विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होतील’; आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या शाळांमध्ये उत्तमोत्तम शिक्षण देण्यात येत असून त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होतील. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, योग्य मार्गदर्शन तसेच लागणाऱ्या सोयी सुविधा देण्याचे नियोजन महापालिकेने केले असल्याचे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

महापालिकेच्या केशवनगर येथील माध्यमिक विद्यालय आणि भागशाळा रावेत यांच्या वतीने इयत्ता ९ वी मध्ये शिकणाऱ्या साहिल कांबळे याने रेखाटलेल्या निसर्ग चित्रांचे भव्य प्रदर्शन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे २० ते २२ जुलै यादरम्यान भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या प्रदर्शनाला माजी नगरसदस्य सुरेश भोईर, माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे तसेच केशवनगर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास चपटे, रामेश्वर पवार, विविध विषयांचे शिक्षक, कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष निवडीनंतर भाजपमध्ये नाराजी; वारंवार डावललं जात असल्याचा आरोप

यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले, या प्रदर्शनाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे महानगरपालिकेच्या विद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या साहिलसारख्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यामुळे वाव मिळत आहे तसेच हा एक इतिहास घडवणारा उपक्रम पालिकेच्या मार्फत राबविण्यात येत आहे याचा महापालिकेला सार्थ अभिमान वाटत आहे.

महापालिकेच्या शाळेतील रावेत येथील विद्यार्थीनी साक्षी गायकवाड हिला जिल्हा चित्र पुरस्कार मिळालेला असून आयुक्त शेखर सिंह यांनी साहिलसोबत तिचेही कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी दोघांना शुभेच्छा दिल्या. साक्षी गायकवाड तसेच विविध विद्यार्थ्यांनी देखील रेखाटलेली चित्र प्रदर्शनात मांडलेली आहेत.

निसर्ग चित्रांच्या प्रदर्शनासोबत विद्यार्थ्यांनी वर्तमान पत्रापासून बनवलेली विठ्ठल मुर्तीही येथे ठेवण्यात आली आहे जी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या उपक्रमांची संकल्पना कलाशिक्षिका अस्मिता गुरव यांची होती यासाठी त्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास चपटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

महापालिकेच्या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचे छंद जोपासण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात, त्यामध्ये चित्रकला स्पर्धांचे आयोजन करणे, पर्यावरणपूरक वस्तू बनविणे, वर्तमानपत्रांपासून सुंदर शिल्प तयार करणे, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button