breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीकरांना आंद्रा प्रकल्पाच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था!

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्याने समस्या सुटणार

पिंपरी । प्रतिनिधी

चिखली आणि परिसरातील सुमारे ९० हजार नागरिकांच्या पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून थेट पाईपद्वारे पाटीलनगर येथील जलकुंभात पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे पवना आणि आंद्रा प्रकल्पातील एकत्रित पाणी मिळाल्यामुळे या भागातील पाणी समस्या निकालात निघणार आहे.

चिखली आणि परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नाबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. याबाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आणि हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याबाबत उपाययोजना करण्याची सूचना प्रशासना केली होती.

पाटीलनगर येथे महापालिका प्रशासनाने २० लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ उभारला आहे. या टाकीमध्ये पवना प्रकल्पातील रावेत बंधाऱ्यातून सुमारे १६ एमएलडी पाणी दिले जाते. एक दिवस २० ते २२ तास आणि दुसऱ्या दिवशी तीन ते चार तास पाणी पुरवठा होतो. आता प्रशासनाने आंद्रा प्रकल्पातील पाण्यासाठी चिखली येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. त्यातील पाणी पाटीलनगर येथील पाण्याच्या टाकीत आणण्यासाठी ६०० एमएम पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे पवना आणि आंद्रा अशा दोन्ही प्रकल्पाचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा – ‘राज्यात पाच महिन्यात १९ हजार ५५३ महिला बेपत्ता’; शरद पवार यांची धक्कादायक माहिती

दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या वतीने आंद्राचे पाणी पाटीलनगर टाकीत आणण्यासाठी पंप बसवण्यात येणार आहे. तो पंप जलशुद्धीरकण केंद्रात दाखल झाला. यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, अंकुश मळेकर, विनायक आबा मोरे,पांडुरंग साने, संदिप शेलार, कपिल म्हेत्रे आदी उपस्थित होते.

..या भागातील पाणी पुरवठा होणार सक्षम!

आंद्रा प्रकल्पातून अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यामुळे पाण्याची टाकी भरण्यास मदत होईल. टाकीसाठी सध्या एक पंप आहे. आणखी एक पंप उपलब्ध करण्याबाबत प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पाणीसाठा होण्यास मदत होईल. चिखली गावठाण, रामदासनगर, नागेश्वर विद्यालय, रामदास नगर टप्पा, महादेवनगर, भांगरे कॉलनी, धर्मराज नगर, शेलारवस्ती, पाटीलनगर, देहू-आळंदी रस्ता, राम मंदिर डिफेन्स कॉलनी या भागातील पाणी पुरवठा सक्षम होणार आहे.

आंद्रा पाणी वितरण व्यवस्था अंतिम टप्प्यात..

समाविष्ट गावांतील पाणी पुरवठा सक्षम करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी व्हीजन-२०२० अंतर्गत आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पाचे काम हाती घेतले. त्यातील आंद्रा प्रकल्पाचे १०० एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले होते. सदर पाणी वितरण व्यवस्था अंतिम टप्प्यात आहे. चिखली, चऱ्होली, मोशी, डुडूळगाव, जाधववाडी, दिघी आदी गावांतील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे समाविष्ट गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होईल.

पिंपरी-चिंचवड शहरासह माझ्या भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांत भविष्यातील ३० वर्षांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन पाणी पुरवठा यंत्रणा सक्षम करण्याचा आमचा निर्धार आहे. आंद्रा प्रकल्पातील पाणी शहरात दाखल झाले आहे. तसेच, भामा आसखेड प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे. चिखलीसह समाविष्ट गावातील पाणी पुरवठा सक्षम करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही केली आहे. लवकरच आंद्राचे पाणी पाटीलनगर येथील पाण्याच्या टाकीत दाखल होईल. त्यामुळे पाणी समस्या सोडवण्यास मदत होईल. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात अडीच वर्षे शहरातील विविध प्रकल्प रखडले. विकासकामे प्रलंबित राहीली. पण, आता महायुतीच्या सत्ताकाळात विकासकामे मार्गी लागत आहेत, ही समाधानाची बाब आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button